काँग्रेसमध्ये आता ‘मुलाखती’तून नेतृत्वाची निवड; राहुल गांधींचा जुन्या फॉर्म्युल्याला धक्का

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच 6 राज्यांचे प्रभारी बदलल्यानंतर आता AICCमध्येही मोठ्या बदलांची प्रक्रिया पुढे सरकली आहे.

News Photo   2026 09 08T120058.560

काँग्रेसमध्ये आता 'मुलाखती'तून नेतृत्वाची निवड; राहुल गांधींचा जुन्या फॉर्म्युल्याला धक्का

काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत मोठ्या (Congress) फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाली असून वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांसाठी पक्षाने यावेळी थेट मुलाखतीचा मार्ग स्वीकारला आहे. AICCच्या नव्या सचिवांच्या निवडीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी उमेदवारांच्या वन टू वन मुलाखती घेतल्या. काँग्रेसच्या इतिहासात वरिष्ठ पदांच्या निवडीसाठी अशा पद्धतीने मुलाखत घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या या प्रक्रियेत संभाव्य उमेदवारांचे 30-40 जणांचे गट तयार करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश यासह विविध राज्यांमधून 100 हून अधिक इच्छुक या प्रक्रियेसाठी उपस्थित होते. AICCमध्ये एकूण 120 सचिवांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांची छाननी सुरू करण्यात आली आहे.

500 सीसीटीव्ही फुटेज, 2 हजार कॉल रेकॉर्ड अन् अखेर काँग्रेस नगसेवकाच्या हत्येचं गुढ उकललं

पक्षातील पारंपरिक शिफारस पद्धतीला पर्याय देत राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष कामगिरीला अधिक महत्त्व देण्याचे धोरण स्वीकारल्याचे मानले जात आहे. संघटनेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे, आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडणारे आणि स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क असलेले कार्यकर्ते या प्रक्रियेत केंद्रस्थानी आहेत. संबंधित नेत्याचे संघटनात्मक योगदान, ग्राऊंडवरील काम, सोशल मीडिया सक्रियता आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव याचा विचार करून निवड केली जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच 6 राज्यांचे प्रभारी बदलल्यानंतर आता AICCमध्येही मोठ्या बदलांची प्रक्रिया पुढे सरकली आहे. नव्या सचिवांच्या निवडीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील नेत्यांसह तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान युवक काँग्रेस आणि NSUIमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना राष्ट्रीय संघटनेत स्थान देऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version