नवी दिल्ली: देशातील सर्वच राजकीय पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला लागले आहेत. भारत जोडो यात्रेपासून कॉग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी परत आल्यापासून आगामी लोकसभा निवडुक ते कोणत्या मतदार संघातून लढतील, याचीच चर्चा सुरू झाली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी प्रियांका गांधी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात हे देखील सांगितले आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करेल, असेही राय म्हणाले.
वाराणसीमध्ये 20014 आणि 2019 मध्ये अजय राय हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. राय यांची गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली.
खिचडी कोणी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस कुटुंबांचे विशेष नाते आहे. यापूर्वी या मतदारसंघातून संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. राहुल गांधी यांनीही अमेठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक जिंकली होती. 2004 पासून अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल यांना 2019 मध्ये गांधी अमेठी या बालेकिल्ल्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जायंट किलर म्हणून उदयास आल्या होत्या. त्यांनी राहुल यांचा सुमारे 55,000 मतांनी पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत राहुल यांना 4,12,867 मते मिळाली, तर स्मृती इराणी यांना 4,67,598 मते मिळाली होती.
तर त्याआधीच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होती. तथापि, स्मृती इराणींच्या 3,00,748 मतांच्या तुलनेत राहुल यांनी निवडणूक लढाईत 4,08,651 मते मिळवून विजय मिळवला होता.
यावेळी अजय रॉय यांनी स्मृती इराणींवर जोरदार टीका केली. अमेठीच्या लोकांना 13 रुपये दराने साखर देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.