आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही

पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Untitled Design   2026 10 07T080017.675

Untitled Design 2026 10 07T080017.675

Rahul Gandhi’s social media post sparks discussion : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्तपासणी प्रक्रियेविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. तब्बल आठ ते नऊ तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, खासदार आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुमारे 50 खासदार आणि जवळपास 250 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना किंग्सवे कॅम्प येथे नेण्यात आले होते. सुमारे दोन तासांनंतर दोघांचीही सुटका करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकाच वाहनातून तेथून रवाना झाले.

सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. लोकशाहीच्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे उरलेसुरले अवशेषही चिखलात ओढले गेले आहेत. याचा हिशोब चुकता केला जाईल. एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्यात यावे आणि मतदार याद्यांची सुरू असलेली विशेष सखोल पुनर्तपासणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

मोठी बातमी! लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् खासदार प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांकडून अटक

आंदोलनादरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार पवन खेरा, के. सी. वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांनाही या कारवाईचा सामना करावा लागला. आंदोलन रात्रभर सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई सुरू केली. आंदोलकांना जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र नेते आणि कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दुसरीकडे, भाजपने काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी वेळ मागितलेली नव्हती. विरोधकांकडे आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांना शेकडो समर्थकांसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याची इच्छा होती, मात्र तेथे इतक्या मोठ्या संख्येने लोकांना सामावून घेण्याची व्यवस्था नसल्याचेही त्रिवेदी यांनी म्हटले. तसेच काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.

Exit mobile version