नवी दिल्ली – संसदेच्या आधिवेशनात सध्या उद्योगपती अदानीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर सरकार जोरदार हल्लाबोल सुरु ठेवला आहे. खासदार राहुल गांधी या मुद्द्यावर आक्रमक दिसत आहेत. इतके की, आधिवेशनादरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य संसदेच्या कार्यवाहीतून काढून टाकण्याची वेळ आली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या महूआ मोईत्रा यांचेही एक वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढले आहे. या निर्णयावर काँग्रेसने टीका करत संसदेच्या कार्यवाहीतून राहुल गांधी यांचे वक्तव्य हटविणे म्हणजे लोकशाही संपवण्यासारखेच आहे, असे म्हटले आहे.
Shashi Tharoor & Narendra Modi : अन् चक्क शशि थरूरांनी केले मोदींचे कौतुक, मोदी म्हणाले..
पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले, की अदानी महाघोटाळ्यावर राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य संसदेच्या कायर्वाहीतून हटवण्यासह लोकसभेत लोकशाहीचे अंत्यसंस्कार केले गेले. ओम शांति..काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आरोप केला होता, की सन 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर अशी जादू झाली की आठ वर्षात उद्योगपती गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.
सरकारच्या काळात नियमात बदल करून विमानतळांचे ठेके अदानी समूहाला दिले गेले. राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींना उद्देशून केली गेलेली काही वक्तव्ये सभापतींच्या आदेशानंतर कार्यवाहीतून हटविली गेली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर दुसऱ्या वक्त्याने बोलणे सुरू केले. त्याचवेळी मोईत्रा यांनी अशी काही वक्तव्ये केली त्यामुळे भाजपचे खासदार चांगलेच संतप्त झाले, त्यांनी मोईत्रा यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध सुरू केला.
या वक्तव्यांवर मोईत्रा यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर सभापतींना असंसदीय व अभद्र भाषेचा वापर केल्यास संसदेच्या कार्यवाहीतून काढून टाकण्यात येईल, असा इशारा दिला होता. विरोध वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोईत्रा यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, मी सफरचंदाला सफरचंदच म्हणेल ना की संत्रा. त्या म्हणाल्या, की मी जे काही म्हटले ते रेकॉर्डमध्ये नव्हते. यावर आता इतकेच म्हणू शकते की मी एका सफरचंदाला सफरचंद म्हणू शकते, नारंगी नाही. जर विशेषाधिकार समितीचा यामध्ये हस्तक्षेप होत असेल तर मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करेन.