Download App

काँग्रेसमधून हकालपट्टी तर भाजपमध्ये ‘इनकमिंग’; राजस्थानच्या राजकारणाचा ‘मूड’ बदलला

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानातील विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. राजधानी जयपूरमध्ये माजी मंत्री धनसिंह रावत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. फुलोरा मतदारसंघातून अपक्ष आमदार राहिलेले डी. डी. कुमावत, माजी आमदार गीता वर्मा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने रावत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपाने त्यांना पार्टीतून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र, आता रावत यांनी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपात प्रवेश मिळवला आहे.

गडकरी शब्दाला पक्के… काकडेंनी सांगितला किस्सा

यासंदर्भात राजस्थान भाजपने एक ट्विट केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लोककल्याणकारी धोरणे आणि भाजपच्या विचारधारेने प्रभावित होत आज अन्य राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, माजी सरकारी अधिकाऱ्यांनी पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आदींनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.

प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. आज काँग्रेसची परिस्थिती बुडत्या जहाजाासारखी झाली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनी प्रभावित होऊन लोकांचा भाजपवरील विश्वास वाढत चालला आहे. आज काँग्रेस सातत्याने शक्तीहीन होत असून भाजपाची ताकद मात्र वाढत चालली आहे.

दरम्यान, याआधी काँग्रेस नेते सुभाष महरियासह अनेक नेते मंडळी भाजपात दाखल झाली आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढली असून आगामी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल असा दावा भाजप नेते करत आहेत. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील या सरकारमध्ये धुसफूस वाढली आहे.  माजी मुख्यमंत्री सचिन पायलट तर अनेक दिवसांपासून आपल्याच सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. त्यामुळे गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद वाढत चालला आहे.

संजय काकडेंकडून फडणवीसांच्या आठवणींना उजाळा अन् खास शुभेच्छा!

काँग्रेसकडून मंत्र्याची हकालपट्टी

राजस्थानमधील महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच सरकारला जाब विचारणारे मंत्री राजेंद्र गुडा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना पत्र पाठवून राजेंद्र गुडा यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस केली. राज्यपालांनी गेहलोत यांची शिफारस मान्य केली आणि गुडा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. राजेंद्र गुडा यांच्याकडे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), होमगार्ड आणि नागरी संरक्षण, पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद होते.

Tags

follow us