Rajasthan Election : केंद्रातील सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी झाली. आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र, त्याआधीच या आघाडीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. ‘आप’ इंडिया (INDIA) आघाडी सोडून राजस्थानात (Rajasthan Election) स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. पक्षाचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनीच ही माहिती दिली आहे.
राजस्थानात आमची युनिट निवडणुकीसाठी तयार आहे. आम्ही प्रत्येक गावात अकरा लोकांची टीम तयार करत आहोत. 22 ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष येणार आहेत. संघटनेच्या सरचिटणिसांबरोबर होणाऱ्या बैठकीत उमेदवारांची पहिली यादी अंतिम करू, आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडे पाठवू, असे मिश्रा म्हणाले. राजस्थान विधानसभेच्या जागा अ,ब आणि क अशा तीन भागात विभागल्या आहेत. अ श्रेणीत पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरतील. ब श्रेणीत जिथे तयारी आहे पण, उमेदवारांबाबत संभ्रम आहे आणि क श्रेणीत आतापर्यंत एकही उमेदवार समोर आलेला नाही.
दरम्यान, दिल्लीतील निवडणुकीवरूनही केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनीही केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता. दिल्लीतील लोकसभा मतदारसंघांच्या मुद्द्यावरून हा वाद वाढला होता. त्यात आता राजस्थानची भर पडली आहे. मध्यप्रदेशातही आप स्वतंत्र लढण्याच्या दिशेने तयारी करत आहे. असे जर घडले तर याचा फटका इंडिया आघाडीला निश्चित बसेल. तसेच आघाडीतील अन्य पक्षांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाटणा, बंगळुरूनंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. मात्र त्याआधीच आघाडीला तडे जाऊ लागले आहेत. आघाडीतील नेत्यांचा परस्परांवरील अविश्वास आणि संशय हे एक मोठे कारण त्यामागे मानले जात आहे. आागमी निवडणुका एकत्र लढणार असल्याचा मुद्दा पुढे येत असताना आघडीतील काही पक्षांनी विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यास विरोध केल्याचे समजते.
BJP कडून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिवराज सिंह यांना डच्चू?