Download App

Video : “ज्या रावळपिंडीत पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय तिथंपर्यंत भारतीय सैन्याची गर्जना ..”, राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा

भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.

Rajnath Singh on Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल संध्याकाळी युद्धविराम झाला. त्यानंतर थोड्यात वेळात पाकिस्तानने युद्धविराम मोडत भारतीय शहारांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. आम्ही फक्त बॉर्डर लगतच्या सैन्य ठिकाणांवरच नाही तर सैन्याने थेट रावळपिंडीपर्यंत हादरा दिला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत ठणकावलं. ते म्हणाले, भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे काय परिणाम होतात हे उरी घटनेनंतर सगळ्या जगाने पाहिलं. पुलवामातही याचा प्रत्यत आला. आता पहलगाम मधील घटनेनंतरही जगाला दिसत आहे की भारताने कशा पद्धतीने एअर स्ट्राइक केली.

दहशतवादा विरुद्ध झिरो टॉलरन्सच्या धोरणावर वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्पष्ट केले आहे की हा नवा भारत आहे. भारत दहशतवादाविरुद्ध सीमापारही कारवाई करु शकतो. ज्या दहशतवाद्यांनी भारताच्या मस्तकावर हल्ला करुन अनेक परिवारांचं कुंकू पुसलं होतं. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून त्यांना न्याय देण्याचं काम केलं. या कारवाईसाठी देशभरात सैन्याचं कौतुक होत आहे.

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) फक्त एक सैन्य कारवाईच नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सामरिक इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. भारत जेव्हा केव्हा दहशतवादा विरुद्ध कारवाई करील तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या आकांसाठी सीमापारही सुरक्षितता राहणार नाही. पाकिस्तानात असणारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. सैन्याने पाकिस्तानच्या नागरिकांना कोणतीही इजा केली नाही. परंतु, पाकिस्तानने भारतीय नागरिक आणि येथील विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे राजनाथ सिंहे यांनी सांगितले.

श्रीनगरमध्ये ड्रोन हल्ला, अमृतसरमध्ये रेड अलर्ट, कच्छमध्ये ब्लॅकआउट… पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यानंतर काय-काय घडले?

follow us