पाटणा : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज (रविवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाच्या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Rashtriya Janata Dal leader and former Deputy Chief Minister Tejashwi Yadav criticized Nitish Kumar)
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेत भाजपसोबत संसार थाटलेल्या नितीश कुमार यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली आहे. नितीश कुमार आधीही आदरणीय होते आणि आजही आहेत. त्यांचे केवळ 45 आमदार होते, मग आम्ही का क्रेडिट घ्यायचे नाही? तेच म्हणायचे की नोकऱ्या देणे शक्य नाही. त्यानंतर 70 दिवसांच्या आत दोन लाखांपेक्षा अधिक जणांना नियुक्ती पत्र दिले.
स्पोर्ट्स पॉलिसी आणली. शिक्षण पद्धतीत सुधारणा केली, आरोग्य व्यवस्था सुधारली, रोजगार, पोलीस यांच्याकडून 17 महिन्यांच्या सरकारमध्ये खूप कामे करुन घेतली. ते थकलेले मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री असताना मी आणि आमच्या मंत्र्यांनी खूप कामे केली. खेळ आताशी सुरु झाला आहे. मी जे बोलतो ते बोलतो. 2024 मध्ये संयुक्त जनता दलाचे अस्तित्वच संपून जाईल, असाही इशारा तेजस्वी यादव यांनी दिला.
नितीश कुमार यांचा राजीनामा :
मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार यांनी आज सकाळीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली होती. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावाही केला होता. त्यानंतर पाच वाजता त्यांनी आठ आमदारांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.