Download App

रेपो रेट जैसे थे! कर्जदारांचा EMI वाढणार नाही; RBI कडून सर्व सामान्यांना मोठा दिलासा

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : दसरा दिवाळीपूर्वी आरबीआयने (RBI) सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज (दि.10) जाहीर झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 6.5 रेपो रेट (Repo Rate) असून, रेपो रेट जैसे थे ठेवण्याची ही चौथी वेळी आहे. सर्व संबंधित पैलूंवर तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ झालेली नसली तरी कर्जदारांचा EMI आहे तोच राहणार असून, ईएमआय कमी होण्यासाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.  (RBI Repo Rate News)

आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये वाढ करत 6.5 टक्के केला होता. त्यानंतर आतापर्यंत यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात 6 वेळा 2.50% ने वाढ करण्यात आली होती.

महागाई आणि जीडीपीचे अंदाजही जाहीर

रेपो दर जैथे ठेवण्याबरोबरच यावेळी आरबीआयकडून महागाई आणि जीडीपीचा अंदाजही जाहीर करण्यात आले. FY 24 साठी महागाईचा अंदाज 5.4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मागील बैठकीत हा अंदाज 5.1 टक्क्यांवरून 5.4 टक्के करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात महागाई कमी होण्याची अपेक्षा अल्याचा अंदाजही यावेळी शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला.

तर, FY 24 साठी GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्के असेल. त्याचवेळी FY25 च्या पहिल्या तिमाहीसाठी GDP चा अंदाज 6.6% वर कायम ठेवण्यात आला असून, भू-राजकीय संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे दास यावेळी म्हणाले.

रेपो रेट म्हणजे काय ?

रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट बँकांच्या कर्जावर परिणाम होतो. त्याचे दर वाढले तर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारखी जवळपास सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. रेपो रेट हा दर म्हणजे ज्या दरावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.

Tags

follow us