Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar : विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावरून केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार टीका केली. हे विधेयक देशाला शतकानुशतके जुन्या काळात घेऊन जाणार आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील अनुपस्थितीबद्दलही सरकारला प्रश्न विचारला. माजी उपराष्ट्रपती गेले कुठे? ते का लपून बसले आहेत?, ते बाहेर येऊन एक शब्दही का बोलू शकत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला.
राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओ ते म्हणाले की, ज्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्या दिवशी वेणुगोपालजींनी मला फोन करून सांगितलं की, उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे… त्यांच्या राजीनाम्यामागे एक मोठी कहाणी आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहिती असेल. काहींना कदाचित माहिती नसेल, पण त्यामागे एक कहाणी आहे. आणि त्यानंतर आणखी एक कहाणी आहे की, ते लपून का बसले आहेत? भारताचे उपराष्ट्रपती अशा स्थितीत का आहेत की ते एक शब्दही बोलू शकत नाहीत? त्यांना का लपून बसावं लागत आहे, असा सवाल राहुल गांधींनी केला.
निवडणूक आयोगावर शंका घेतली, नंतर माफीनामा! संजय कुमारांवर गुन्हा दाखल…
पुढं ते म्हणाले, भारताचे माजी उपराष्ट्रपती का लपून बसले आहेत? अशी परिस्थिती का आली आहे की ते बाहेर येऊन एक शब्दही बोलू शकत नाहीत? अचानक, जे व्यक्ती राज्यसभेत नेहमी धडाकेबाज पद्धतीने बोलायचे, ते पूर्णपणे गप्प झाले आहेत. तर हा तो काळ आहे, ज्यात आपण जगत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.