पाच कोटींमध्ये विराट कोहलीला बोलावले? प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबतच्या दाव्याने खळबळ

Dinesh Sharma-Falahari Baba: प्रेमानंद महाराजांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहे.

Sant Premanand Maharaj

Sant Premanand Maharaj

Sant Premanand Maharaj : संत प्रेमानंद महाराज (Sant Premanand Maharaj) यांच्या वृंदावन येथील आश्रमात साधक रसिक दुलारी यांच्या मृत्यू झाला आहे. त्यावरून वाद सुरू असताना आणखी एक वादसमोर आला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी महाराज (Dinesh Sharma-Falahari Baba) यांनी पत्र लिहून आश्रमाशी संबंधित विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) यांना 5 कोटी रुपये देऊन आश्रमात बोलावण्यात आले होते आणि त्यातून प्रेमानंद महाराजांना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा फलाहारी महाराज यांनी केलीय.

विराट कोहलीला 5 कोटींमध्ये बोलावल्याचा दावा

फलाहारी महाराज यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, विराट कोहली यांना 5 कोटी रुपये देऊन आश्रमात आणणारी कंपनी राजस्थानमधील आहे. या कंपनीशी संबंधित काही व्यक्तीनंतर साधूच्या वेशात आश्रमात दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या व्यक्ती सध्या प्रॉपर्टीशी संबंधित कामांमध्ये सक्रिय असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रमातील काही व्यक्तींच्या भूमिका आणि त्यांच्या कारवायांची चौकशी करण्याची मागणी फलाहारी महाराज यांनी केलीय.


प्रेमानंद महाराजांबाबत काय म्हटले?

फलाहारी महाराज यांनी संत प्रेमानंद महाराज यांना सनातन धर्म आणि हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे संत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या आसपासच्या काही व्यक्तींमुळे महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. अशा व्यक्तींपासून प्रेमानंद महाराजांनी दूर राहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तसेच प्रेमानंद महाराजांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहे.

वृंदावनमधील जमिनीबाबतही आरोप
फलाहारी महाराज यांच्या पत्रात वृंदावन आणि न्यू बेलवन आश्रम परिसरातील जमिनीच्या व्यवहारांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यमुनेच्या पूरक्षेत्रातील जमिनीची खरेदी-विक्री सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्यवहारांमध्ये अधिकाऱ्यांची कथित मिलीभगत असल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिसरात जमीन व्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किडनी चोरी, मुले गायब होण्याच्या आरोपांचाही उल्लेख
फलाहारी महाराज यांनी आपल्या पत्रात जमीन व्यवहारांव्यतिरिक्त किडनी चोरी आणि मुले गायब होण्यासारख्या गंभीर आरोपांचाही उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या गंभीर आरोपांबाबत कोणतीही अधिकृत पोलीस चौकशी, एफआयआर किंवा सरकारी कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हे आरोप सध्या केवळ दावे म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.

प्रेमानंद महाराजांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी
फलाहारी महाराज यांनी प्रेमानंद महाराजांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. साधूच्या वेशात काही व्यक्ती कथितरीत्या चुकीच्या कारवायांमध्ये सहभागी असू शकतात आणि त्याचा परिणाम प्रेमानंद महाराजांच्या प्रतिमेवर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तसेच प्रेमानंद महाराजांनी गोवर्धन गिरिराजजी परिसरात राहावे, अशी विनंतीही फलाहारी महाराज यांनी केली आहे.

Exit mobile version