Satyapal Malik On Pulwama Attack : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ते नाकारले. त्यामुळे पुलवामा हल्ला हा विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या अक्षमतेचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा दावा माजी राज्यपालांनी केला आहे. मलिकांच्या या दाव्यामुळे आता देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
बिहार, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय अशा राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल पदावर असताना केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यावरून मोठा राजकीय संघर्ष तयार झाला होता, त्याच निवृत्तीनंतर मलिक यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. द वायर या इंग्रजी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक असे दावे केले आहेत ज्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.
पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबद्दल राग नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींना काश्मीरबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान काश्मीरबाबत संभ्रमात आहेत, त्यांना काश्मीरबाबत काहीच माहिती नाही.’
या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवणे चुकीचे होते आणि ताबडतोब राज्याचा द्यायला हवा. त्यांनी दावा केला की ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना गोव्यातून मेघालयात हलवण्यात आले कारण त्यांनी पीएम मोदींना राज्य सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सांगितले होते.
Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप
मलिक यांचा दावा आहे की पंतप्रधानांच्या आजूबाजूचे लोकच भ्रष्टाचारात गुंतले आहेत आणि ते अनेकदा पंतप्रधान कार्यालयाचे नाव घेऊन भ्रष्टाचार करतात. ते पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधानांना भ्रष्टाचाराचा फारसा तिटकारा नाही.’
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला ही केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी चूक होती, असा खळबळजनक दावाही मलिक यांनी केला. या हल्ल्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. या घटनेत सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ला हा विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या अक्षमतेचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप माजी राज्यपालांनी केला.
Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत
पुलवामा हल्ल्याच्या वेळी राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री होते. मलिक यांनी दावा केला की सीआरपीएफने आपल्या जवानांसाठी विमान मागितले होते, परंतु गृह मंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर सीआरपीएफने ज्या रस्त्यावरून जवानांना पाठवले त्याचा तपास केला नाही. या हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती.
द वायरला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी असेही सांगितले की, पुलवामा हल्ल्याबाबत मला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मौन बाळगण्यास सांगितले होते. निवडणुकीत सरकार आणि भाजपला फायदा व्हावा यासाठी पुलवामा हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवर करण्याचा हेतू होता, मला ही बाब नंतर लक्षात आली. असा आरोप मलिक यांनी केला आहे.