Download App

Loksabha 2024 : INDIA आघाडीचे लक्ष सेमीफायनलवर; नव्या वर्षात होणार फायनलची तयारी

मुंबई : विरोधकांच्या INDIA आघाडीची एकत्रित बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पार पडली होती. या बैठकीनंतर आघाडीतील सर्वात कळीचा प्रश्न ठरलेले जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी फॉर्म्युलाही दिला होता, पण या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता या जागावाटपाचा निर्णय पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (seat shearing of the INDIA Alliance will be decided after assembly elections of the five states)

कोणत्या पाच राज्यात निवडणुका आहेत?

देशातील मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या पाच विधानसभा निवडणुकांमधील विरोधी आघाडीच्या पक्षांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी जागा दिल्या जातील, असे मानले जात आहे. येथे ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याला लोकसभा निवडणुकीसाठी जास्त जागा दिल्या जातील, असे सूत्र पुढे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

के. अन्नामलाई : तमिळनाडूत भाजपचं अख्ख राजकारण फिरविणारा मोदी-शाहंचा हुकमी एक्का

काँग्रेसचा 350 जागांवर दावा :

नुकतीच हैदराबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत जागावाटप कोणत्या सूत्रावर होणार यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसला जागावाटपात जास्तीत जास्त जागा मिळव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी एकमुखाने अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली. त्यानुसार काँग्रेसने किमान 350 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काँग्रेसला इतक्या जागा द्याव्यात, यावर एकही पक्ष तयार होताना दिसत नाही. काँग्रेसला इतक्या जागा दिल्यास आपला वाटा कमी होईल, अशी भीती सर्वांना सतावत आहे..

तृणमूल आणि आम आदमी पक्षाने काँग्रेसला पंजाब आणि बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अधिक जागा देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ज्या राज्यात ज्या पक्षांची ताकद आहे, तिथे त्यांनीच जास्त जागांवर निवडणूक लढवावी, अशी या दोन्ही पक्षांनी मागणी केली आहे. पंजाब किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये ते मजबूत असतील तर त्यांना अधिक जागांवर लढण्याची संधी मिळायला हवी, असा या दोन्ही पक्षांचा दावा आहे. पण आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच कोणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

गौतम अदानी अन् पवारांची भेट कशी झाली? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

रनर अप फॉर्म्युल्याच्या आधारे जागा वाटपावर चर्चा होणार?

विरोधी आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत अद्याप कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र रनर अप फॉर्म्युल्याच्या आधारे जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रनर अप फॉर्म्युला काय?

ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत ती जागा त्याच पक्षाला मिळेल. तर अन्य जागांवरील दावेदार ठरविण्यासाठी 2014 आणि 2019 मधील मतांचा विचार केला जाईल.  या दोन्ही निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षांना त्या जागेवर प्राधान्य देण्यात येईल.

तर ज्या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत आहे, तेथे प्रादेशिक पक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. पंजाब-दिल्लीमध्ये 50-50 फॉर्म्युला लागू होऊ शकतो. जागावाटपाबाबत छोट्या पक्षांची मागणी जास्त आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा नाही, त्या राज्यांमध्ये पक्षाने लहान भावाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रादेशिक पक्षांचे म्हणणे आहे.

आसाम, तेलंगणा, कर्नाटकसह 9 राज्यांमध्ये नेतृत्व काँग्रेसकडे असेल. म्हणजेच या 9 राज्यांमधील जागावाटपाचा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.

Tags

follow us