इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतीय शेअर बाजाराला; सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Untitled Design 62

Untitled Design 62

Sensex falls by 821 points : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागल्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 821 अंकांनी घसरून 73 हजार 421 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी-50 मध्ये 276 अंकांची घसरण होऊन तो 23 हजार 80 अंकांवर आला आहे.

अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर आशियायी बाजारांमधील नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारावर देखील झाला. सकाळपासूनच विक्रीचा दबाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः जागतिक भू-राजकीय तणाव वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळाले होते. गिफ्ट निफ्टी 23 हजार 96 अंकांवर घसरल्याने भरतोय बाजारात मोठ्या पडझडीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि ती प्रत्यक्षात देखील दिसून आली. आशियायी बाजारपेठांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुरूवातीलाच सुमारे 7 टक्क्यांनी घसरला. हॉंगकॉंगचा हँग सेंग निर्देशांक जवळपास 2 टक्क्यांनी खाली आला, तर चिनचा सीएसआय-300 निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई-225 निर्देशांक देखील 4.6 टक्क्यांनी कोसळल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याने या भागातील तणाव अधिक वाढला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा बाजारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराण आणि हिजबुल्लाहचा इस्रायलवर संयुक्त हल्ला; सायरनने दणाणली शहरे, पलटवाराची इस्रायलची तयारी

युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर झाला. ब्रेंट क्रूडच्या किंमती 3.18 टक्क्यांनी वाढून 96.05 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या, तर अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट अर्थात डब्लूटीआय क्रूड 3.46 टक्क्यांनी वाढून 93.67 डॉलर प्रति बॅरलवर गेले. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी ही वाढ चिंतेची बाब मानली जात आहे.

याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये देखील कमजोरी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ३४ पैशांनी घसरून 95.32 या पातळीवर खुला झाला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे रुपयावर दबाव वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणताही बदल केला नसला तरी आगामी आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 टक्के ठेवण्यात आला आहे. वाढती महागाई, आगतिक तणाव आणि तेलाच्या किंमतींतील वाढ यामुळे गुंतवणूकदार अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

एकूणच, मध्य पूर्वेतील वाढत संघर्ष, कच्च्या तेलाच्या किंमतींमधील उसळी, रुपयावरील दबाव आणि जागतिक बाजारतील नकारात्मक संकेत यांचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून गुंतवणूकदारांसाठी हा आठवड्याचा पहिलाच दिवस धक्कादायक ठरला आहे.

Exit mobile version