इराण आणि हिजबुल्लाहचा इस्रायलवर संयुक्त हल्ला; सायरनने दणाणली शहरे, पलटवाराची इस्रायलची तयारी
इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी इराण-लेबनानचे ध्वज एकत्र दाखवणारे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत लेबनानला पाठिंबा दर्शवला.
Iran and Hezbollah launch joint attack on Israel : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. रविवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागत थेट हल्ला चढवला, तर लेबनानमधील हिजबुल्लाह संघटनेनेही मिसाइल आणि ड्रोनच्या माध्यमातून इस्रायलला लक्ष्य केले. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलची संरक्षण यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली असून अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन वाजवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने उत्तर इस्रायलच्या दिशेने चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. विशेष म्हणजे, एप्रिलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराणकडून इस्रायलवर करण्यात आलेला हा पहिलाच थेट क्षेपणास्त्र हल्ला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यापूर्वी इराणने इस्रायलला लेबनानमधील लष्करी कारवाया थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र, इस्रायलने बेरूतसह हिजबुल्लाहच्या विविध तळांवर हवाई हल्ले सुरूच ठेवले. त्यानंतर इराणने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
राज्यात मान्सूनची धडक, 25 जिल्ह्यांवर यलो अलर्टचे सावट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी इराण आणि लेबनानचे ध्वज एकत्र दाखवणारे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत लेबनानला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रेजाई यांनी युद्धविरामाचे उल्लंघन आणि लेबनानवरील हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीने इस्रायलवर प्रतिबंधित फॉस्फरस बॉम्बचा वापर करून युद्धगुन्हा केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये अमेरिकेचेही संगनमत असल्याचा दावा करत, इस्रायलने पुन्हा हल्ला केल्यास आणखी विनाशकारी कारवाई केली जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे.
दुसरीकडे, हिजबुल्लाहने इस्रायली सैनिकांना लक्ष्य केल्याचा दावा केला असून परिस्थितीची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही देण्यात आल्याचे वृत्त आहे. इस्रायली सैन्याने मात्र इराणची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर या हल्ल्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याची घोषणाही इस्रायलने केली आहे.
मात्र, इस्रायलने पुन्हा आक्रमक कारवाई केल्यास मध्य पूर्वेतील सर्व अमेरिकन लष्करी तळ लक्ष्य केले जातील, असा गंभीर इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून जगभरातील देशांचे लक्ष आता या संघर्षाकडे लागले आहे.