राज्यात मान्सूनची धडक, 25 जिल्ह्यांवर यलो अलर्टचे सावट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काहीसा विलंब झालेला मान्सून आता तळ कोकणात पोहोचला असून राज्यभर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 59

Monsoon arrives in Maharashtra : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाले आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काहीसा विलंब झालेला मान्सून आता तळ कोकणात पोहोचला असून राज्यभर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. अनेक भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोठी बातमी! नो भुजबळ, नो राणा… राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या विदर्भालाही मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला असून 6 ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तसेच या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला आणखी काही दिवस लागणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

follow us