यंदाचा उन्हाळा होणार अधिक कडक! मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता
जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता तब्बल 78 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
This year’s summer will be more intense : आगामी उन्हाळा अधिक उष्ण ठरण्याची शक्यता असून एल निनोचा प्रभाव अपेक्षेपेक्षा अधिक काळ टाकण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता तब्बल 78 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होण्याच्या शक्यता असून, राज्याला आतापासूनच उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात एनओएएच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने नोव्हेम्बरमध्ये प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, पुढील वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देखील एल निनोचा प्रभाव कायम राहू शकतो. यापूर्वी डिसेंबरमध्ये एल निनोची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचून जानेवारीपासून कमी होण्याचा अंदाज होता. मात्र, नव्या हवामान प्रारूपांनुसार त्याचा प्रभाव अधिक काळ टिकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, काही हवामान प्रारूपांमध्ये एल निनोची तीव्रता डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे, तर काही प्रारूपांनुसार जानेवारीच्या सुरुवातीला त्याचा प्रभाव सर्वाधिक असू शकतो. विशेष म्हणजे, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2027 या तीन महिन्यांत एल निनो कायम राहण्याची शक्यता 78 टक्के असल्याचं ताज्या अंदाजातून स्पष्ट होत आहे.
एसआयआर मोहिमेत 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा, राज्यात 99.94 टक्के मतदारांची नावं पुन्हा मतदार यादीत
एल निनोच्या तीव्रतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. 1.5 ते 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमानवाढ दर्शवणाऱ्या तीव्र एल निनोची शक्यता 70 टक्क्यांहून अधिक असल्याचं होसाळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. एल निनोचा प्रभाव अचानक संपत नाही, तर तो हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे त्याचा परिणाम आगामी उन्हाळ्यातही जाणवण्याची शक्यता आहे.
एल निनोचा प्रभाव आगामी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत टिकणार का, याकडेही हवामान अभ्यासकांचं लक्ष आहे. काही दीर्घकालीन अंदाजांनुसार त्याचा प्रभाव जून 2027 पर्यंत जाणवू शकतो. मात्र, हा दीर्घकालीन अंदाज असल्याने त्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. पावसाळ्याच्या स्वरूपाबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्यासाठी आगामी हवामान अंदाजांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, एल निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेता राज्याने पुढील चार ते पाच महिन्यांसाठी उष्णतेशी संबंधित उपाययोजनांचं नियोजन करणं आवश्यक आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा साठा, जलव्यवस्थापन आणि वाढत्या तापमानापासून नागरिकांचं संरक्षण यावर भर देण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी उन्हाळा आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या हवामान आणि पाणी व्यवस्थापन यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.