अडीच वर्षांपूर्वी हरवली, कुटुंबीयांनीही आशा सोडली; मात्र Google आणि ChatGPT मुळे पुन्हा भेट झाली!
Google ChatGPT Helps Find Missing Woman: तब्बल अडीच वर्षांपूर्वी घर सोडलेल्या जुलेखा मुखीद शेख यांची चॅट जीपीटीमुळे कुटुंबीयांशी भेट झाली.
Google ChatGPT Helps Find Missing Woman: घरातून निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधी परत येईल, याची वाट पाहत कुटुंबीयांचे डोळे थकतात. दिवस जातात, महिने उलटतात आणि हळूहळू ती व्यक्ती पुन्हा भेटण्याची आशाही धूसर होऊ लागते. मात्र, कधी कधी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. याचाच प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे. तब्बल अडीच वर्षांपूर्वी घर सोडलेल्या 45 वर्षीय जुलेखा मुखीद शेख यांची अखेर त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाली आहे. विशेष म्हणजे, या भावनिक पुनर्भेटीमागे गुगल सर्च (Google Search) आणि चॅट जीपीटी (ChatGPT) यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
झालं असं की, जुलेखा शेख 3 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडूर येथील संविता आश्रमात दाखल झाल्या होत्या. मुंबईतील कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आश्रमात ठेवण्यात आले होते. जुलेखा मुखीद शेख यांनी मानसिक तणावाच्या अवस्थेत घर सोडले होते. मात्र, जुलेखा यांच्याबाबत माहिती मिळवण्याचे मोठे आव्हान आश्रमासमोर होते. त्यांना आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवायचे होते, पण त्यांचा मूळ गावाचा पत्ता किंवा नातेवाइकांची माहिती मिळत नव्हती.
संवादातून मिळाले धागेदोरे, AI ची घेतली मदत
जुलेखा यांना पुन्हा त्यांच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसान चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. त्यांनी जुलेखा यांच्याशी सातत्याने संवाद साधण्यास सुरुवात केली. बोलता बोलता त्यांच्या आठवणीतून समोर येणारी छोटीशी माहितीही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरत होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.
या शोधमोहिमेत गुगल सर्च आणि चॅट जीपीटी यांची मदत घेण्यात आली. जुलेखा यांनी दिलेल्या माहितीचे धागेदोरे जोडत त्यांच्या मूळ गावाचा शोध घेण्याचा प्रयत्न गुगल सर्च आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश आले. परभणीतील निर्भया पोलीस पथकाच्या मदतीने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला.
अडीच वर्षांची प्रतीक्षा संपली; पती आश्रमात पोहोचले!
अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर जुलेखा यांचा कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क झाला. अडीच वर्षांपासून दूर असलेल्या आपल्या माणसांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळाल्याने हा क्षण त्यांच्यासाठीही भावनिक ठरला. ही माहिती मिळताच त्यांचे पती मुखीद शेख यांनी 9 नोव्हेंबर रोजी थेट सिंधुदुर्गातील संविता आश्रम गाठले. त्यानंतर ते जुलेखा यांना सोबत घेऊन घरी परतले.
अजित पवारांच्या अपघात प्रकरणी ‘मफलर’चे पोस्टर चर्चेत; 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा होणार?
अशा प्रकारे अडीच वर्षांपासून सुरू असलेला शोध अखेर संपला आणि एका कुटुंबाची पुन्हा भेट घडून आली. या संपूर्ण शोधमोहिमेबाबत किसान चौरे यांनी सांगितले की, जुलेखा यांच्याशी संयमाने संवाद साधला. गुगल सर्च आणि चॅट जीपीटी सारख्या डिजिटल साधनांचा वापर करून त्यांचे मूळ गाव शोधण्यात आले. त्यानंतर परभणीतील निर्भया पोलीस पथकाच्या सहकार्याने त्यांची कुटुंबीयांशी भेट घडवून आणणे शक्य झाले.
6 चौकार अन् 5 षटकार… सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी ; अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक
तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि काही माणसांनी घेतलेली शोधण्याची जिद्द यामुळे अडीच वर्षांपासून दुरावलेली माणसे पुन्हा एकत्र आली. एका कुटुंबासाठी हा केवळ घरी परतण्याचा प्रवास नव्हता, तर हरवलेली आशा पुन्हा गवसण्याचा क्षण होता.