’चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान रंगणार मराठी चित्रपटांचा चार दिवसीय महोत्सव

‘चित्रपताका - 2026’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 14T145944.296

Preparations for the ‘Chitrapataka’ Marathi Film Festival are in the final stages : मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा, वर्तमानातील सर्जनशील प्रवाह आणि भविष्यातील नव्या शक्यता यांचा वेध घेणाऱ्या ‘चित्रपताका – 2026’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शुक्रवारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच महोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांना याप्रसंगी योग्य त्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित हा महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होणार आहे. हा चार दिवसीय महोत्सव 33 मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच सिनेविषयक वैचारिक देवाणघेवाण, दिग्दर्शक-कलाकारांशी संवाद आणि सिनेविषयक कार्यशाळा अशा विविधांगी उपक्रमांनी सज्ज झाला आहे. महोत्सवाचे संचालक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, तर क्युरेटर म्हणून डॉ. संतोष पाठारे जबाबदारी सांभाळत आहेत.

चित्रपटांची निवड, विविध सत्रांचे नियोजन आणि महोत्सवाच्या आशयपूर्ण मांडणीकडे विशेष लक्ष देण्यात आले असून सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या समन्वयातून महोत्सवाच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी शुक्रवारी महोत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सर्व समित्यांच्या कामाचा आढावा घेतला, तसेच पूर्वतयारी पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.

एसआयआर मोहिमेत 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा, राज्यात 99.94 टक्के मतदारांची नावं पुन्हा मतदार यादीत

यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून प्रेक्षक आणि सहभागी चित्रपटकर्मी यांच्या सुरक्षा, सुविधा आणि सुलभता या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. याप्रसंगी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह महामंडळाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महामंडळ यांच्यातील समन्वयातून आयोजनाच्या विविध बाबींची पूर्तता वेगाने सुरू असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज झाली आहे. महोत्सवाची प्रेक्षक नोंदणी https://chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर सुरू असून त्यास राज्यभरातील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘चित्रपताका – 2026’च्या माध्यमातून मराठी चित्रपटांचा वैविध्यपूर्ण आविष्कार अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून, जास्तीत जास्त चित्रपटप्रेमींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.

‘चित्रपताका’ महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, पहिल्या पर्वास मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा महोत्सवाची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे. रविवारी, 15 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुख्य सभागृहात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी ‘मफलर’चे पोस्टर चर्चेत; 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा होणार?

यावेळी दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्या ‘बंधू’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार असून या सिनेमात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या दमदार अभिनयाद्वारे दोन भावांतील भावबंधांची हृदयस्पर्शी कहाणी मांडली आहे. अद्याप अप्रदर्शित असलेल्या ‘बंधू’ सिनेमाचा आस्वाद घेण्याची संधी सिनेरसिकांना महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात मिळणार आहे. तर 18 नोव्हेंबर रोजी संतोष डावखर दिग्दर्शित आणि भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत नामांकन प्रवेशिका मिळालेल्या ‘गोंधळ’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

याशिवाय महोत्सवात विविध विषय, आशय आणि शैलींचे 30 हून अधिक मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. प्रस्थापित दिग्दर्शकांच्या चित्रपटांसह समकालीन मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळे प्रयोग, आशयघन कलाकृती आणि नव्या पिढीच्या दिग्दर्शकांचे चित्रपट यांचा या निवडीत समावेश आहे. जुन्या आणि नव्या मराठी चित्रपटांचा एकत्रित अनुभव देण्याचा प्रयत्न यंदाच्या महोत्सवातून करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, समीक्षक आणि चित्रपटप्रेमींना एकत्र आणणारा हा महोत्सव केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता मराठी चित्रपटांच्या आशय, अभिव्यक्ती, तंत्रज्ञान आणि बदलत्या स्वरूपावर चर्चा घडवून आणणारे व्यासपीठ ठरणार आहे. चित्रपटविषयक ज्ञान, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारे 15 हून अधिक विशेष कार्यक्रम महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. परिसंवाद, विशेष मुलाखती, मास्टरक्लास आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध पैलूंचा ऊहापोह केला जाणार आहे.

6 चौकार अन् 5 षटकार… सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी ; अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती या महोत्सवात होणार असून त्यासोबतच चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेशी संबंधित विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मास्टरक्लासेस या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. यंदाच्या महोत्सवात नव्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून…’ या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रदेश, संस्कृती, लोकजीवन चित्रभाषेतून मांडण्याची संधी नवोदित चित्रपटकर्त्यांना मिळणार आहे. तसेच ‘पुस्तक ते सिनेमा’ या उपक्रमातून सिनेमाध्यमात रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांना सिनेक्षेत्रातील दिग्दर्शक, निर्माते व पटकथाकारांशी संवाद साधण्याची थेट संधी उलपब्ध करून देण्यात येणार आहे.

चित्रपटप्रेमींना महोत्सवातील सर्व उपक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी चारही दिवसांच्या सहभागाकरिता केवळ 100 रुपये इतके नाममात्र नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या नोंदणी शुल्कातून प्राप्त होणारी संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचा आनंद घेण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. www.chitrapataka.com या संकेतस्थळावर महोत्सवाचे वेळापत्रक, चित्रपटांची माहिती, विविध सत्रांचे तपशील आणि नोंदणीविषयक माहिती उपलब्ध आहे.

follow us

संबंधित बातम्या