Download App

मोठी बातमी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर; PM मोदींनी केली घोषणा

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मी अडवाणींशी बोललो असून, हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे मोदींनी म्हटले आहे. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असून भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांनी नेतृत्त केल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (LK Advani To Be Conferred Bharat Ratna Award)

कोण आहेत लालकृष्ण अडवाणी?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे सातवे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची, पाकिस्तान येथे एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद अडवाणी आणि आईचे नाव ग्यानी देवी आहे. अडवाणी यांचे वडील व्यवसायाने उद्योजक होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथून झाले आहे. मात्र फाळणीच्यावेळी अडवाणींचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले.

उत्तर प्रदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष निनादणार! मुख्यमंत्री योगींनी काढलं पत्र

अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) ते गृहमंत्री होते. भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. 10व्या आणि 14व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2015 मध्ये अडवाणींना भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

जाणून घ्या लालकृष्ण अडवाणींबाबतच्या 10 खास गोष्टी 

अडवाणी यांनी कराचीतील सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
1947 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव झाले.
अडवाणी 1970 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले.
अडवाणी हे चित्रपट समीक्षकदेखील राहिले आहेत. अडवाणींना चॉकलेट, चित्रपट आणि क्रिकेटची आवड आहे.
1944 मध्ये त्यांनी कराचीच्या मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले.
अडवाणींनी ‘माय कंट्री, माय लाइफ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
सर्वांना आश्चर्याचा धक्का देत अडवाणींनी 2013 मध्ये सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून त्यांनी सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्षपद भूषवले.
अडवाणींनी आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक रथयात्रा काढल्या आहेत. यात ‘राम रथयात्रा’, ‘जनदेश यात्रा’, ‘सुवर्ण जयंती रथयात्रा’, ‘भारत उदय यात्रा’ आणि ‘भारत सुरक्षा यात्रा’ तसेच ‘जनचेतना यात्रा’ या प्रमुख यात्रांचा समावेश आहे.

 

follow us