Download App

खामगावची चांदी पोहचली थेट चंद्रावर! ‘बीग बी’ अमिताभ बच्चन अन् सोनिया गांधींनाही घातलीय भुरळ

2007 मध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांचा श्रीसिद्धिविनायकाला बोललेला एक नवस पूर्ण झाला. आता नवस काय होता, हे तर सांगता येणार नाही, पण नवस फेडण्यासाठी त्यांनी गणपतीचे वाहन असलेल्या उंदराची साडे तीन किलोची मुर्ती सिद्धिविनायक मंदिराला देणार होते. आता अमिताभ बच्चन राहतात मुंबईत, श्रीसिद्धिविनायक मंदीर मुंबईत, त्यामुळे त्यांनी ही मूर्ती मुंबईतच बनवून घेणे अपेक्षित होते. मात्र ते आले थेट बुलढाण्याला. बुलढाण्यातील खामगावमधून त्यांनी तब्बल साडे तीन किलो वजनाचा चांदीचा उंदीरमामा तयार करुन घेतला आणि तो श्रीसिद्धिविनायकाला अर्पण केला. इतकंच नाही तर त्यांच्या घरातील चांदीच्या मूर्ती देखील खामगावातील आहेत.

कट टू 2023 मधील आजचा दिवस. भारतीयांसाठी आजचा दिवस परमोच्च आनंदाचा आहे. आज चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रवार उतरण्याच्या तयारीत आहे. देशासाठी महत्त्वकांक्षी आणि अभिमानास्पद असलेल्या चांद्रयान – 3 मोहिमेतही खामगावचा खारीचा वाटा आहे. खामगाव येथील चांदी आणि फॅब्रिक्स चांद्रयान 3 मोहिमेत वापरण्यात आलं आहे. चांद्रयान 3 च्या स्टर्लिंग ट्युबमध्ये खामगावची चांदी वापरण्यात आली आहे. त्यामुळे खामगावची चांदी आता थेट चंद्रावर पोहचल्याची भावना इथले लोकं व्यक्त करत आहेत. या दोन घटनांवरुन दिसून येत की वर्ष बदलली, लोकं बदलली, पण खामगावच्या चांदीची शुद्धता आणि विश्वासार्हता आजही कायम आहे.

अगदी इस्रोपासून ते अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राजकारणातील सोनिया गांधी, विलासराव देशमुख आणि चंद्राबाबू नायडू अशा वेगवेगळ्या काळातील मोठमोठ्या व्यक्ती चांदीसाठी खामगावचीच निवड करतात.

पण खामगावची चांदी एवढी प्रसिद्ध कशी?

इथले व्यापारी सांगतात, खामगावमधील चांदीचा व्यापार हा फार जुना म्हणजे साधारणा 150 वर्षापासूनचा आहे. भारताचं चांदीचं केंद्र मानलं जाणाऱ्या खामगावला सिल्व्हर सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. इथली चांदी ही शुद्धतेसाठी ओळखले जाते. त्यामुळे अनेक मोठे नेते, अभिनेते, क्रिकेटपटू आणि सरकारच्या संस्था इथूनच चांदी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. दरवर्षी चांदीच्या मूर्ती, चांदीची भांडी इत्यादीची धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील लोकांकडून खरेदी केली जाते.

खामगावच्या ज्वेलर्संनी आजपर्यंत जवळपास भारतातील 80% चांदीची मंदिरं तयार केली आहेत. हैदराबादमधील तिरुपती मंदिराची प्रतिकृति बनवण्यासाठी जवळपास 400 किलो चांदी वापरण्यात आली होती. चित्ररंजन लोकोमोटिव्हज, रेल्वे उत्पादक इंजिन यामध्येही खामगावच्या चांदीचा वापर केला जातो. इस्त्रोनेही यापूर्वी अनेकदा उपग्रह मोहिमांसाठी खामगावची चांदी वापरली आहे. या प्रसिद्धीमुळे आणि विश्वासार्हतेमुळे खामगावमधून दर महिन्याला जवळपास 25 हजार किलो चांदी ही वितरित केली जाते.

Tags

follow us

वेब स्टोरीज