Medha Patkar Arrested : साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना (Medha Patkar) अटक केली. मेधा पाटकर यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाटकर यांच्या विरोधात न्यायालयाने दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या अवमानप्रकरणी दंड ठोठावला होता. परंतु पाटकर यांनी दंडाची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाटकर मात्र हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला होता. याच प्रकरणात मेधा पाटकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
अटक केल्यानंतर मेधा पाटकर यांना आजच साकेत न्यायालयात हजर करण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी 3 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मागील वर्षी मॅजिस्ट्रेट कोर्टाने 23 वर्षे जुन्या प्रकरणात मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तक्रारदार व्हीके सक्सेना यांना 10 लाख रुपये मोबदला म्हणून द्यावेत असे निर्देश दिले होते.
मोठी बातमी : मानहानी प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या तुरुंगवास
परंतु, मेधा पाटकरांचं वाढतं वय आणि खालावत चाललेलं आरोग्य लक्षात घेता न्यायालयाने त्यांच्या तुरुंगावासाच्या शिक्षेला सूट दिली होती. दहा लाख रुपये जमा करणे आणि प्रोबेशन बाँड भरण्याचे निर्देश कायम ठेवले होते.
जुलै 2024 मध्ये मेधा पाटकरांना सन 2000 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणात न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी पाटकरांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
पुढील कार्यवाहीसाठी 3 मे 2025 तारीख निश्चित करण्यात आली होती. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की 8 एप्रिलला सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या आदेशातील अटींचे पालन करण्यात दोषी अपयशी ठरला तर शिक्षेचा पुनर्विचार करण्यास न्यायालयाला भाग पडेल. शिक्षेच्या आदेशात बदल करावा लागेल. यानंतर मेधा पाटकरांकडून बुधवारी एक निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयात अपील प्रलंबित राहिल्याने मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी पाटकर यांनी या निवेदनात केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती.
व्हीके सक्सेना मानहानी खटल्यात Medha Patkar दोषी; 24 वर्षांपुर्वीच्या प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निकाल