Strong customer preference for the new Honda City : होंडा कार्स इंडियाला अद्ययावत सिटी माध्यम आकाराच्या सेडानच्या लाँचचा तात्काळ फायदा मिळाल्याचे दिसून आले आहे. मे 2026 मध्ये या गाडीच्या विक्रीत मोठी उसळी नोंदवली गेली. नव्या होंडा सिटीच्या 1,227 गाड्यांची विक्री झाली असून एप्रिल 2026 मधील अवघ्या 177 गाड्यांच्या तुलनेत ही विक्री तब्बल 593.22 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सिटीला पुन्हा एकदा ग्राहकांचा मजबूत प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कामगिरी अनेक कारणांनी महत्वाची मनाली जात आहे. मागील महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवण्याबरोबरच, नोव्हेंबर 2023 नंतर प्रथमच होंडा सिटीने मासिक विक्रीचा 1,200 गाड्यांचा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये या मॉडेलच्या 1,336 गाड्यांची विक्री झाली होती. त्यामुळे मे 2026 मधील विक्री ही गेल्या सुमारे अडीच वर्षांतील सर्वोत्तम मासिक कामगिरी ठरली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान होंडा सिटीला 1,000 गाड्यांच्या विक्रीचा आकडा गाठता आला नव्हता. डिसेंबर 2025 मध्ये 943 गाड्यांची विक्री ही त्या वर्षातील सर्वोच्च कामगिरी होती. मात्र नव्या मॉडेलच्या आगमनानंतर विक्रीत झपाट्याने झालेली वाढ कंपनीसाठी दिलासादायक ठरली आहे. भारतीय ग्राहकांमध्ये सेडान गाड्यांची मागणी कमी होत असताना सिटीने पुन्हा एकदा आपले स्थान मजबूत करण्याची चिन्हे दाखवली आहेत.
अहिल्यानगर उद्ध्वस्त करणाऱ्या विचारांविरोधात आयुष्यभर लढणार, सुजय विखेंचा लंकेंना अप्रत्यक्ष टोला
गेल्या महिन्यात अद्ययावत होंडा सिटीचे भारतीय बाजारात अधिकृतपणे पदार्पण झाले. प्रवासी वाहन क्षेत्रातील आपली उपस्थिती बळकट करण्यासाठी कंपनीने आखलेल्या व्यापक धोरणाचा हा महत्वाचा भाग आहे. भारतीय बाजारपेठेत स्पर्धा वाढत असताना होंडाने यंदा सहा नवीन उत्पादने सादर करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून, त्यामध्ये विविध ग्राहकवर्गाला आकर्षित करणाऱ्या नव्या वाहनांचा समावेश असणार आहे.
नव्या होंडा सिटीमध्ये आकर्षक आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. समोरील भागात नव्याने डिझाईन केलेली ग्रील, अधिक धारधार स्वरूपाचा बंपर, ब्लेड आय एलईडी प्रकाशयोजना आणि जोडलेली प्रकाशपट्टी देण्यात आली आहे. तसेच नवीन धातूच्या चाकांमुळे गाडीला अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी लूक मिळाला आहे. मागील बाजूस नव्या एलईडी टेललॅम्प्स, सुधारित बंपर सजावट आणि डिकीवर स्पॉयलर देण्यात आला असून त्यामुळे गाडीचा एकूण लूक अधिक आकर्षक आणि आधुनिक बनला आहे.
विक्रीतील ही झेप केवळ नव्या डिझाईनमुळेच नव्हे, तर ब्रॅण्डवरील ग्राहकांचा विश्वास आणि सेडान विभागातील सिटीची मजबूत ओळख यांचा देखील परिणाम मानला जात आहे. आगामी महिन्यांत ही वाढ कायम राहते का, याकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागले असून, नव्या सिटीच्य यशामुळे होंडाच्या भारतीय बाजारातील पुनरागमनाला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
