Stuck In Iran During War Know About Travel Insurance Coverage Rules : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे आखाती देशात तणावाचे वातावरण असून, सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला असून, ही परिस्थिती कधी पूर्ववत होईल याबाबतची अनिश्चितता कायम आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कुणी आखाती देशातील युद्धात अडकला असाल तर, ट्रॅव्हल इन्शुरन्सचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो आणि त्याचे नियम काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
देशांतर्गत प्रवासावेळी ट्रॅव्हल विमा अनिवार्य नाही, परंतु अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासावेळी प्रवाशांना वैध विमा असणे आवश्यक आहे. त्यामुळे दुबई, कतार, कुवैत किंवा अन्य आखाती देशात कामावनिमित्त किंवा फिरायला गेलेल्या सर्वांकडे विमा असेल. मात्र, तुमच्याकडे असलेल्या ट्रॅव्हल विम्याआधारे दावा करू शकणार की नाही ते मुख्यतः तुमच्या फ्लाइटमध्ये व्यत्यय येण्याचे कारण आणि पॉलिसी कधी खरेदी केली या दोन गोष्टींवर अवलंबून असते.
ईटीच्या एका अहवालात, प्रोबस येथील आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रमुख सरिता जोशी सांगतात की, बहुतेक सामान्य प्रवास विमा पॉलिसींमध्ये दिला जाणारा कव्हरेज हा व्यत्ययाच्या कारणावर अवलंबून असतो. भू-राजकीय तणावामुळे अचानक हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे जर प्रवासी दुबई, इराण, कतार किंवा मध्य पूर्वेतील इतर भागात अडकले असतील, तर हे प्रवासी प्रवास विलंब, प्रवासातील व्यत्यय किंवा चुकलेल्या कनेक्टिंग फ्लाइट फायद्यांच्या अंतर्गत दावा करू शकतात. पण या सर्व घटना घडण्यापूर्वी पॉलिसी खरेदी केलेली असणे आवश्यक आहे. पण, काही तज्ज्ञांच्या मते, जर विमान सेवेतील व्यत्यय हा गृहयुद्ध, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र संघर्षामुळे उद्धभवला असेल तर ते प्रवास विमा फायद्यांच्या अंतर्गत कव्हर केले जात नाही.
प्रवास विम्यामध्ये वॉर एक्सक्लूजन कलम काय आहे?
वॉर एक्सक्लूज कलम हा बहुतेक प्रवास विमा पॉलिसींचा एक सामान्य भाग आहे. युद्ध, अंतर्गत अशांतता, आक्रमण, लष्करी कारवाई किंवा आण्विक घटनेमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेल्या नुकसानासाठी कव्हरेज दिला जात नाही. जर एखाद्या प्रवाशाचे सक्रिय युद्धामुळे थेट नुकसान झाले असेल तर, या परिस्थितीत विमा कंपनी जबाबदार नसते. पण, कोणतीही पूर्व कल्पना न देता सुरू झालेलं युद्ध, अचानक एअर स्पेस बंद होणे किंवा सावधगिरी म्हणून मार्ग बदलणे यासारख्या प्रकरणांमध्ये परिस्थिती कधी सामान्य होईल याची खात्री नसते, त्यामुळे दावा मंजूर होईल की नाही हे युद्धाशी थेट नुकसान किती संबंधित आहे आणि विमा कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामांचे कसे अर्थ लावते यावर अवलंबून असते असे जोशी सांगतात.
डिस्क्लेमर : वरील बातमी सर्व सामान्य माहितीवर आधारित असून, लेट्सअप मराठी कोणताही दावा करत नसून, ट्रॅव्हल इन्शुरन्सबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही काढलेली पॉलिसी नीट अभ्यासून घ्यावी.
