Download App

चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!

“ही लोकशाहीची हत्या आहे, आणि आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही…” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलेली चालाखी हाणून पाडली आहे. न्यायालयाने चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवाराला महापौरपदी विजयी घोषित केले आहे. न्यायालयाने हा निकाल देताना निवडणूक अधिकारी अनिल मसिहा यांना जबाबदार धरले असले तरीही पडद्यामागे ही भाजपची चालाखी होती हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपबद्दल संपूर्ण देशभरात एक चुकीचा संदेश गेला आहे तर न्यायालयावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Supreme Court has declared the candidate of Aam Aadmi Party as the winner of Chandigarh Municipal Corporation.)

पण तावडेंनी अशी नेमके अशी कोणती चालाखी केली होती? नेमके काय घडले होते? आणि सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला, पाहुया सविस्तर.

स्वतंत्र भारतातील पहिले पूर्वनियोजित आणि उत्तर भारतातील सर्वात सुंदर शहर चंदीगड. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असल्याने या शहराला राजकीय दृष्याही मोठे महत्व आहे. सहाजिकच इथली महानगरपालिका आणि महापौरपदही अत्यंत महत्वाचे समजले जाते. हेच महत्वाचे महापौरपद भाजपने मागील आठ वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवले होते. यातील आधीचे पाच वर्ष पूर्ण बहुमत होते. त्यामुळे त्यावर चर्चा नको. पण त्यानंतरची सलग तीनन वर्षे पूर्ण बहुमत नसताना एवढ्या मोठ्या महापालिकेचे महापौरपदी आपला उमेदवार उभा करणे तो निवडून आणणे तसे अवघडच!

भाजपसाठी हीच अवघड कामगिरी सातत्याने पार पाडली ती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी. 2019 च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचे राजकारण संपले संपले असे वाटत होते त्या तावडेंनी मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करुन दिल्या.

रेडिओवरील रेशमी आवाज हरपला : प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

ऑक्टोबर 2021 मध्ये तावडे यांची चंदीगडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात भाजप दोन नंबरला राहिला. पण महापौरपदावर सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारली. पहिल्या वर्षीच्या महापौरदाच्या निवडणुकीत भाजपला 14 मते मिळाली तर आपला 13. अवघ्या एका मताने भाजपने मैदान मारले. याचे कारण निवडणूक होताच आम आदमी पक्षाच्या एका आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर काँग्रेसच्या सात आणि शिरोमणी अकाली दलाच्या एका अशा आठ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. सहाजिकच भाजपचा विजय सोपा झाला.

दुसऱ्या वर्षी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने आम आदमी पक्षात प्रवेश केला. इथे आता भाजपचेही 14 नगरसेवक झाले अन् आम आदमी पक्षाचेही चौदाच. यावेळीही काँग्रेसचे सहा आणि शिरोमणी अकाली दलाचा एक असे सात नगरसेवक तटस्थ राहिले. दोन्ही पक्षाला समसमान मते असताना इथे कामाला आला एक नियम. चंदीगड महापालिकेच्या नियमानुसार तिथल्या खासदारांनाही महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. चंदीगडला भाजपच्या किरण खेर खासदार आहेत. खेर यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले अन् पुन्हा एकदा भाजपने एका मताने बाजी मारली.

आता यंदा तिसऱ्या वर्षी काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण यंदा आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आपचे पुन्हा 13 नगरसेवक झाले होते. तर काँग्रेसचे सात. या दोन्ही पक्षांनी यंदा इंडिया आघाडी म्हणून एकत्र येत ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि बहुमताचा आकडाही तयार केला. आता काहीही झाले तरी यंदा भाजपला पाणी पाजायचेच अशी तयारी केली. भाजपसमोर मोठे आव्हान होते. अशावेळी भाजपने मनोज सोनकर यांना मैदानात उतरविले. तर आम आदमी पक्षाने कुलदीप कुमार यांना संधी दिली.

“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात

आम आदमी पक्षाच्या 13 आणि काँग्रेसच्या सात अशा 20 नगरसेवकांनी कुमार यांना मतदान केले. सहाजिकच निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागेल अशी जवळपास सर्वांनाच खात्री होती. पण या दोन्ही पक्षांचे गणित निकालानंतर चुकले. या दोन्ही पक्षांची आठ मते बाद ठरली. भाजपला स्वतःची 14, किरण खेर यांचे एक आणि शिरोमणी अकाली दलाचे एक अशी 16 मते मिळाली. आठ मते बाद ठरल्याने 16 मते घेतलेले भाजपचे सोनकर महापौरपदी विराजमान झाले.

पण यानंतरच एक व्हिडीओ व्हायरल झाला अन् सगळ्या देशात महापौर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल महिसा यांची छी-थू झाली. मसिह यांनी आप उमेदवाराला जी 20 मते मिळाली होती, त्यातील आठ मते स्वताच्या हाताने पेनाच्या खुणा करून बाद ठरवली आणि भाजपच्या उमेदवाराला महापौर घोषित केले. न्यायालयाच्या आदेशानुसार मतममोजणी प्रक्रियेची सारी दृष्ये टिपण्यासाठी तिथे कॅमेरा बसविण्यात आला होता. त्या कॅमेऱ्यात आपले कृत्य चित्रीत होत असल्याचे माहिती असूनही मसिहा यांनी मतपत्रिकांवर खुणा करुन त्या बाद ठरविल्या आणि भाजपला विजयी घोषित केले. त्यानंतर आपण असे कृत्य केल्याचे न्यायालयातही त्यांनी मान्यही केले.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अत्यंत पारदर्शीपणे निकाल देत भाजपला सणसणीत चपराक लगावली. ही लोकशाहीची हत्या असल्याची थेट टिप्पणी करून आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही अशा शब्दात दिलासा दिला. त्यानंतर प्रत्यक्ष निकालात मसिहा यांनी बाद ठरविलेली आठ मते ग्राह्य धरत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला महापौर घोषित केले आहे. आता त्यांचे हे महापौरपद किती दिवस राहते हेही बघणे महत्वाचे ठरणार आहे. कारण न्यायालयाने निकाल देण्याच्या आदल्या रात्रीच भाजपचे विजयी उमेदवार सोनकर यांनी राजीनामा दिला होता. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या तरी महापालिकेत आम आदमी पक्ष अल्पमतात आणि भाजप बहुमतात असल्याचे चित्र आहे.

follow us