जंक फूडच्या पाकिटावर आता ‘रेड वॉर्निंग’!; इस्रायल, चिली, मेक्सिकोचा अनुभव काय ?

Junk Food Red Warning सध्या बहुतांश पॅकेज्ड फूडच्या पाकिटावर पोषणमूल्यांची माहिती असते. मात्र, ही माहिती अनेकदा पाकिटाच्या मागच्या बाजूला

Supreme court Order FSSAI Red Warning Labels On Packaged Junk Food

Supreme court Order FSSAI Red Warning Labels On Packaged Junk Food

Supreme court Order FSSAI Red Warning Labels On Packaged Junk Food : तुम्ही बाजारात चिप्सचं पाकीट खरेदी करता… कोल्ड्रिंकची बाटली घेता… किंवा लहान मुलांसाठी चॉकलेट विकत घेता… पण हे पदार्थ खाताना त्यामध्ये किती साखर, किती मीठ आणि किती फॅट आहे, याचा विचार किती वेळा करता? कारण आता तुमच्या हातात येणाऱ्या प्रत्येक पॅकेज्ड फूडच्या पाकिटावर एक लाल इशारा अर्थात रेड वॉर्निंग दिसण्याची शक्यता आहे. म्हणजेच ‘हाय शुगर’, ‘हाय फॅट’ आणि ‘हाय सॉल्ट’… कारण, सर्वोच्च न्यायालयाने FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला फ्रंट ऑफ पॅक वॉर्निंग लेबलचे नियम अंतिम करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली आहे.

पुणेकरांच्या ताटात पोषणाचा अभाव! 81 टक्के पुरुषांमध्ये बी-12 ची कमतरता; KEM रिपोर्ट

भारतासाठी ही संकल्पना नवी असली, तरी इस्रायल, चिली आणि मेक्सिकोसारख्या देशांनी यापूर्वीच अशा प्रकारची वॉर्निंग लेबल्स लागू केली आहेत आणि विशेष म्हणजे, या देशांमधील संशोधनातून ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये बदल झाल्याचं समोर आलं आहे. पण कोर्टाच्या या निर्णयामुळे खरंच भारतीय लोकांच्या खरेदीच्या सवयी बदलतील का? कंपन्यांना आपल्या उत्पादनांमधील साखर आणि मीठ कमी करावं लागेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतात हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा…

लाल इशारा नेमका काय सांगणार?

सध्या बहुतांश पॅकेज्ड फूडच्या पाकिटावर पोषणमूल्यांची माहिती असते. मात्र, ही माहिती अनेकदा पाकिटाच्या मागच्या बाजूला असते. ती समजून घेण्यासाठी ग्राहकाला पोषणशास्त्राची माहिती असणंही आवश्यक ठरतं. यावर उपाय म्हणून आता पाकिटाच्या समोरच्या बाजूला लाल रंगातील षटकोनी चिन्ह म्हणजेच रेड हेक्सागॉन देण्याची संकल्पना आहे. एखाद्या उत्पादनात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त साखर, फॅट किंवा मीठ असल्यास त्यावर स्वतंत्र इशारा असेल. म्हणजेच ग्राहकाला पाकीट हातात घेताच त्या पदार्थामध्ये काय जास्त आहे, हे समजणार आहे. हा केवळ माहिती देण्याचा निर्णय नाही, तर ग्राहकाच्या खरेदीच्या निर्णयावर थेट परिणाम करण्याचा प्रयत्न आहे.

वर ज्याप्रमाणे उल्लेख केला आहे की,भारतासाठी ही संकल्पना नवी असली, तरी इस्रायल, चिली आणि मेक्सिकोसारख्या देशांनी यापूर्वीच अशा प्रकारची वॉर्निंग लेबल्स लागू केली आहेत आणि विशेष म्हणजे, या देशांमधील संशोधनातून ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये बदल झाल्याचं समोर आलं आहे. यासाठी आपण इस्रायलचं उदाहरण पाहूया…

तर, इस्रायलमध्ये 2020 पासून पॅकेज्ड फूडवर रेड वॉर्निंग लेबल्स बंधनकारक करण्यात आली. सुरुवातीला साखर, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटसाठी मर्यादा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर 2021 मध्ये या मर्यादा आणखी कठोर करण्यात आल्या. या धोरणाचा परिणाम काय झाला? तर, 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, किमान एक रेड वॉर्निंग असलेल्या उत्पादनांची विक्री, इशारा नसलेल्या उत्पादनांच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी कमी झाली. हाय शुगरची वॉर्निंग असलेल्या उत्पादनांच्या विक्रीत तर जवळपास 25 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. इतकंच नाही, तर कंपन्यांनीही आपल्या उत्पादनांच्या रेसिपी बदलण्यास सुरुवात केली. इस्रायली कंपन्यांनी तयार केलेल्या 1,007 उत्पादनांपैकी 137 उत्पादनांमध्ये 2020 मध्ये बदल करण्यात आले. म्हणजेच कंपन्यांनाही नव्या नियमांशी जुळवून घ्यावं लागलं.

आता चिलीचं उदाहरण बघूया…चिलीने 2016 मध्येच काळ्या रंगातील अष्टकोनी वॉर्निंग चिन्हं लागू केलं. ‘अल्टो एन’ म्हणजेच ‘यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त आहे’, असा स्पष्ट संदेश या लेबलमधून दिला जातो. साखर, मीठ, सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज जास्त असलेल्या पदार्थांवर ही चिन्हं लावली जातात. या नियमांबरोबरच मुलांना अशा उत्पादनांच्या जाहिराती दाखवण्यावर आणि शाळांमध्ये त्यांची विक्री करण्यावरही निर्बंध घालण्यात आले. याचा परिणाम काय झाला? तर, संशोधनानुसार, लेबल लागू झाल्यानंतर पॅकेज्ड पेयांच्या खरेदीत अंदाजित पातळीच्या तुलनेत 23.7 टक्क्यांची घट झाली. पुढील टप्प्यात लेबल असलेल्या अन्नपदार्थ आणि पेयांमधून मिळणाऱ्या साखरेच्या खरेदीत 36.8 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

एवढेच नव्हे तर, चिलीमध्ये न्याहारीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही सीरियल्समध्ये साखर आणि कॅलरीज कमी करून नवीन उत्पादने बाजारात आणण्यात आली. यामध्ये नेस्लेच्या चोकोपिकचाही समावेश होता. पण, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे चिलीमध्ये लेबलिंगबरोबरच जाहिराती आणि शाळांमधील विक्रीवरही निर्बंध होते. त्यामुळे हा बदल केवळ वॉर्निंग लेबलमुळेच झाला, असं ठामपणे म्हणता येत नाही.

इस्रायल आणि चीलीप्रमाणे असा प्रयोग मेक्सिकोमध्येही राबवण्यात आला येथे 2020 पासून अतिरिक्त कॅलरीज, साखर, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि सोडियम असलेल्या उत्पादनांवर काळ्या रंगातील वॉर्निंग बंधनकारक झाले. 2025 मधील एका सर्वेक्षणानुसार, लेबलमुळे खरेदी बदललेल्या ग्राहकांपैकी 38.7 टक्के लोकांनी संबंधित उत्पादन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला, तर 30.5 टक्के लोकांनी कमी वॉर्निंग असलेलं उत्पादन निवडलं. म्हणजेच पॅकेटवरचा एक छोटीशी वॉर्निंग ग्राहकाला दुसरा पर्याय निवडायला भाग पाडू शकते हे यावरून अधोरेखित झालं.

भारतात हा निर्णय किती प्रभावी ठरणार का? आणि खरा कस कशाचा लागणार? तर,भारतामध्ये लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पॅकेज्ड फूड, चिप्स, बिस्किटं, चॉकलेट्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत पाकिटावर स्पष्ट वॉर्निंग दिसल्यास ग्राहकांना पदार्थ निवडताना अधिक सजग निर्णय घेता येऊ शकतो. पण भारतासमोर काही वेगळी आव्हानंही आहेत.

यात पहिलं आव्हान म्हणजे भारतातील खाद्यसंस्कृती…आपल्याकडे केवळ पॅकेज्ड फूडच खाल्लं जात नाही. मिठाई, नमकीन, फरसाण, वडापाव, समोसा आणि रस्त्यावर मिळणारे अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर पाकिटावरील वॉर्निंग लेबलचे नियम लागू होणार नाहीत. म्हणजेच पॅकेज्ड फूडवर इशारा असेल, पण त्याच वेळी उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांबाबत ग्राहकांना अशी माहिती मिळणार नाही.

दुसरं आव्हान म्हणजे या नियमांसाठी ठरवल्या जाणाऱ्या मर्यादा…सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला एक महत्त्वाची सूचना दिली आहे. साखरेसाठी केवळ अॅडेड शुगर नव्हे, तर एकूण साखरेचा विचार करावा. तसेच फॅटसाठी केवळ अॅडेड फॅटऐवजी सॅच्युरेटेड फॅटचा विचार करण्यास सांगितलं आहे. या मर्यादा खूप कमी ठेवल्या तर, जवळपास प्रत्येक उत्पादनावर रेड वॉर्निंग दिसू शकते आणि खूप जास्त ठेवल्या तर, अनेक हानिकारक उत्पादनं या नियमांच्या कक्षेबाहेर राहू शकतात. त्यामुळे योग्य मर्यादा निश्चित करणं हे FSSAI समोरचं मोठं आव्हान असणार आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाने रेड वॉर्निंग लेबलबाबत FSSAI ला चार महिन्यांची मुदत दिली आहे. म्हणजेच पुढील चार महिन्यांत या नियमांची अंतिम रूपरेषा ठरणार आहे. पण भारतात हा निर्णय यशस्वी होण्यासाठी केवळ पाकिटावर रेड वॉर्निंगचा इशारा लावून चालणार नाही. तर, पोषणमूल्यांच्या मर्यादा शास्त्रीय पद्धतीने निश्चित कराव्या लागतील. कंपन्यांनी चुकीची माहिती देऊ नये, यासाठी कठोर देखरेख ठेवावी लागेल. ग्राहकांमध्ये पोषणमूल्यांविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल. मुलांना लक्ष्य करणाऱ्या जंक फूडच्या जाहिरातींबाबतही ठोस धोरण आखावं लागेल आणि कंपन्यांना केवळ लेबल टाळण्यासाठी नव्हे, तर उत्पादन खरंच आरोग्यदायी करण्यासाठी बदल करावेत, याची काळजी घ्यावी लागेल.

इस्रायल, चिली आणि मेक्सिकोमधील अनुभव बघता खाद्यपदार्थांच्या पाकिटावर दिलेला स्पष्ट इशारा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम करू शकतो. कंपन्यांनाही उत्पादनांमधील घटक बदलण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतं.मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रेड वॉर्निंग दिसली म्हणून लोक लगेच जंक फूड खाणं बंद करतीलच असं नाही. पण ते काय खात आहेत, याचा विचार करण्यास नक्कीच प्रवृत्त होऊ शकतात आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हाच या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. आता प्रश्न एवढाच आहे की, भारतात हे नियम केवळ पाकिटांवर दिसणारा इशारा ठरणार की, भारतीयांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याची सुरुवात करणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Exit mobile version