Adhir Ranjan Chaudhary : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. या अविश्वास ठरावावरील चर्चेत भाग घेत कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) तुलना थेट नीरव मोदीशी केली होती. त्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द करण्यात आलं आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळं अधीर रंजन चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संसदीय कामकाजात अडथळा आणल्याच्या आणि पंतप्रधांनाची बदनामी केल्याच्या आरोपावरून अधीर रंजन चौधरी यांना तीन आठवड्यांपूर्वी लोकसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणला होता. यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आलं होतं. विशेषाधिकार समिती या प्रकरणी जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत चौधरी निलंबित राहणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणातील वादग्रस्त भाग संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी चौधरी यांना निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आलं.
‘सामना’च्या टीकेवर ठाकरेंसमोरचं शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुम्ही तुमचं काम…’
आता लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. विशेषाधिकार समितीने निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठरावही मंजूर केला. त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
Lok Sabha's Privileges Panel adopts resolution recommending revocation of suspension of Congress leader Adhir Ranjan Chowdhury
— Press Trust of India (@PTI_News) August 30, 2023
अधीर रंजन चौधरी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. यावेळी त्यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त करतो, असं अधीर रंजन यांनी यांनी विशेषाधिकार समितीला सांगितलं, अशी माहिती भाजप खासदार सुनील कुमार सिंह यांनी दिली. सुनील कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखालील विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी निमंत्रित केले होते
दरम्यान, अधीर रंजन चौधरींचे निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव लवकरात लवकर लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल, असे विशेषाधिकार समितीच्या सदस्याने सांगितले.
खासदारांचे निलंबन यापूर्वीही झाले
विरोधी पक्षाच्या खासदाराला निलंबित करण्याची किंवा त्यांचे निलंबन मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक खासदारांना त्यांच्या वागणुकीवरून आणि त्यांनी सभागृहात वापरलेल्या शब्दांमुळे अनेकवेळा निलंबित करण्यात आले आहे. यावेळी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि दुसरीकडे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि राज्यसभेतील राघव चढ्ढा यांनाही निलंबित करण्यात आले.