Download App

स्वाती मालीवाल… ‘आप’मध्येच राहुन लावला केजरीवालांच्या ‘तख्ताला’ सुरुंग

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी उघडली होती. भाजपच्या विजयानंतर, स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटोही शेअर केला आहे, यात महाभारत काळातील द्रौपदीचा फोटो आहे. त्यासोबत त्यांनी, रावणाचाही अहंकार बाकी राहिला नव्हता, मग आम आदमीचा काय राहील? असा खोचक सवालही विचारला. (Swati Maliwal contributed to the defeat of Arvind Kejriwal and Aam Aadmi Party)

पण कोण आहेत स्वाती मालीवाल आणि त्यांनी आम आदमी पक्षात राहूनच केजरीवाल यांच्या दिल्लीला कसा सुरुंग लावला आहे?

जानेवारी 2024 मध्ये आम आदमी पक्षाने स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवले. पण मार्च 2024मध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली तेव्हा स्वाती मालीवाल परदेशात गेल्या. त्यावेळी मालीवाल यांनी वैयक्तिक कारणे सांगितली होती. मे महिन्यात केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले तेव्हा स्वाती त्यांना भेटायला गेल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या खाजगी सचिवाने त्यांना तिथे मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, केजरीवाल यांचे खाजगी सचिव बिभव यांनी स्वातीला ८ कानशि‍लात लगावल्या. या घटनेत, केजरीवाल यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी बिभवची बाजू घेतली, त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी आपविरुद्ध बंड पुकारले. स्वाती म्हणाल्या की, काही भीतीमुळे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने विभववर कारवाई केली नाही.

दिल्लीच्या जनतेकडून भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त; विजयानंतर शाहांची आपवर टीका

स्वाती मालीवाल या कधी काळी अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी केजरीवाल यांच्यासोबत राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. दोघेही समाजिक सेवेत एकत्र काम करत होते. नंतर अण्णा हजारे यांच्या चळवळीतून दोघांनी राजकारणात प्रवेश केला. दिल्लीत सरकार स्थापन झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी स्वाती यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. एका रॅलीत अरविंद केजरीवाल यांनी स्वाती यांचा सिंहीण म्हणून उल्लेख केला होता.

जानेवारी 2024 मध्ये दिल्लीच्या तीन जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुशील गुप्ता यांच्या जागी स्वाती यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. एकेकाळी स्वाती यांची गणना आपच्या सर्वोच्च नेतृत्वात केली जात असे. पण मागच्या वर्षभरापासून मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यांनी भाजपचा किंवा आम आदमी पक्षाचा थेट प्रचार केला नाही. परंतु व्हिडिओ आणि फोटोंमधून त्यांनी केजरीवाल यांना चांगलेच घेरले होते. मालीवाल यांनी दिल्लीच्या विकासाबाबत अरविंद केजरीवाल यांनी दिलेली सर्व जुनी विधाने उपस्थित केली.

Delhi Election : 27 वर्षांचा वनवास संपला… मायक्रो प्लॅनिंगने भाजपचे दिल्लीत थाटात पुनरागमन

मालीवाल यांनी स्वच्छ पाणी, दिल्लीतील रस्ते आणि घाणीबाबत प्रत्येक परिसराला भेट दिली. एवढेच नाही तर मालीवाल यांनी या मुद्द्यांवरून अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानालाही घेराव घातला. मालीवाल यांनी पक्षातील नेत्यांना तिकिटे देण्याचा मुद्दाही उपस्थित केला. याशिवाय, आतिशी या मालीवाल यांच्या पहिल्यापासूनच रडारवर होत्या. मालीवाल यांनी आतिशी आणि त्यांच्या जुन्या विधानांद्वारे ‘आप’वर जोरदार हल्लाबोल केला. दिल्ली निवडणुकीत झोपडपट्ट्या हा महत्वाचा मुद्दा बनला तेव्हा स्वाती यांनी एक व्हिडिओ शेअर केला. यात झोपडपट्टीवासीयांसाठी बांधलेली घरे जीर्ण अवस्थेत होती. झोपडपट्टीवासीयांना ही घरे का मिळाली नाहीत असा प्रश्न स्वाती यांनी विचारला. स्वाती यांनी समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांचाही चांगलाच उपयोग केला. या सगळ्यामुळे केजरीवाल यांना महिला सुरक्षा आणि इतर मुद्द्यांवर बॅक फुटवर जावे लागले.

follow us