Download App

“उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय दुसरं..” तामिळनाडूच्या मंत्र्याची जीभ घसरली

उत्तर भारतीय लोकांनी 17,18,19 मुलं जन्माला घातली कारण त्यांच्याकडे दुसरं कामच नाही, असे वक्तव्य तामिळनाडू सरकारमधील वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी केले आहे.

Tamil Nadu News : तामिळनाडूत सध्या हिंदी भाषा विरोधाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आाल आहे. सत्ताधारी द्रमुक पक्षाकडून केंद्र सरकारच्या हिंदी बाबतच्या धोरणांना कडाडून विरोध केला जात आहे. यात आणखी पुढे जाऊन राज्य सरकारने बजेटमध्ये ₹ हे चिन्हच हटवून टाकले. यावरुन सुरू झालेला वाद अजूनही धुमसत असतानाच एका मंत्र्याने उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर भारतीय लोकांनी 17,18,19 मुलं जन्माला घातली कारण त्यांच्याकडे दुसरं कामच नाही, असे वक्तव्य तामिळनाडू सरकारमधील वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूच्या खासदारांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुडियाट्टम येथे एक विरोध प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात बोलताना मंत्री मुरुगन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. केंद्रातील सत्तेतील लोकांनी लोकसंख्या नियंत्रित करण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकसंख्या नियंत्रित केली. पण उत्तर भारताकडे पाहा. तिथे असा कोणताच नियम नाही. मुलांना जन्माला घालण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कोणतंच काम नाही. तिथे प्रत्येकाने 17,18 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला घातली, असे मंत्री मुरुगन म्हणाले.

DMK नेत्याच्या मुलानेच बनवलं होतं रुपयाचं चिन्ह; तामिळनाडू सरकारने का हटवलं?

मुरुगन म्हणाले, आपल्या संस्कृतीत एक पुरुष एकाच महिलेशी विवाह करू शकतो. पण उत्तर भारतातील महिला पाच किंवा 10 पुरुषांशी विवाह करू शकतात. तिथले पाच पुरुष एकाच महिलेशी लग्न करतात. ही त्यांची संस्कृती आहे असे आणखी वादग्रस्त वक्तव्य मंत्री मुरुगन यांनी केले. तामिळनाडू सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात आहे. मतदारसंघांची पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातील राज्यांचे संसदेतील लोकप्रतिनिधीत्व कमी होण्याची भीती आहे. याउलट उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधीत्व अनेक पटींनी वाढले आहे.

follow us