Download App

मोठी बातमी! तेलंगणाचे माजी CM केसीआर यांच्या मुलीला अटक; दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई

Delhi Excise Policy Case : तेलंगणाचे माजी मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandra Shekhar Rao) यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता (K. Kavita) आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. कविता यांच्या हैदराबाद येथील घरी ईडीच्या पथकाने आज छापे टाकले होते. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात (Delhi Excise Policy Case) त्यांचे नाव आले होते. त्यानंतर आता कविता यांना थेट अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या या कारवाईवरून भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी विरोध प्रदर्शनास सुरुवात केली आहे.

ईडीच्या छापेमारीच्या आधी कविता तपास यंत्रणांनी पाठवलेल्या समन्सनंतर चौकशीसाठी हजर राहिल्या नव्हत्या. याआधी दिल्ली दारू घोटाळ्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीने दावा केला होता की कविता या मद्य व्यापाऱ्यांच्या साऊथ लॉबीशी संबंधित आहेत. ज्यांनी 2021-22 साठी दिल्ली अबकारी धोरणात मोठी भूमिका बजावण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

ईडीने आरोपपत्रात आरोप केला आहे की, बीआरएस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता ‘साऊथ लॉबी’चा भाग होती. ज्यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांना 100 कोटी रुपये दिले. कविता यांनी मात्र हे आरोप नाकारले होते आणि ईडीच्या नोटिसांचे वर्णन “मोदी नोटीस” असे केले होते.

कविता आप नेत्यांच्या संपर्कात

ईडीने मागील वर्षी पहिल्यांदा आमदार के. कविता यांना समन्स बजावले होते. आम आदमी पार्टीचे संचार प्रमुख विजय नायर यांच्या संपर्कात कविता होत्या. यानंतर विजय नायर यांना तपास यंत्रणांनी दिल्ली अबकारी धोरणातील घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ईडीने त्यांच्यावर दक्षिण गटाचा हिस्सा असल्याचा आरोप केला होता. या गटात हैदराबादमधील व्यापारी आणि अन्य राजकीय नेत्यांचा समावेश आहे. ज्यांनी दिल्लीतील सत्ताधारी पार्टीला शंभर कोटी रुपये लाच पाठवली होती.

कविता यांच्या माजी सीएलाही अटक 

याआधी आमदार कविता यांनी त्यांचे माजी चार्टर्ड अकाउंटंट गोरंटला आण अरुण रामचंद्र पिल्लई यांचे लेखी निवेदन प्रसिद्ध केले होते. केंद्रीय तपास मंडळाने गोरंटला यांना फेब्रुवारीमध्येच अटक केली होती तर पिल्लई यांना मागील वर्षातील मार्च महिन्यात ईडीने अटक केली होती. आमदार कविता यांची चौकशी केल्यानंतर ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या चौकशी संदर्भात माजी चार्टर्ड अकाउंटंचीही चौकशी केली होती.

ईडीला दिलेल्या जबाबात गोरंटला यांनी मान्य केले होते की के. कविता यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमु्ख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याबरोबर राजकीय युती आहे. मार्च 2021 मध्ये कविता विजय नायर यांना भेटल्या होत्या हे देखील गोरंटला यांनी मान्य केलं होतं.

follow us