Telangana Election : तेलंगाणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Telangana Election) जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. पण, एक अपक्ष उमेदवार सर्वाधिक चर्चेत आहे. हा उमेदवारांच्या तुलनेत जरा वेगळा आहे. त्यामुळेच येथे त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव पद्मराजन आहे. पद्मराजन यांनी गजवेल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे त्यांच्या विरोधात खुद्द राज्याचे मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मैदानात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पद्मराजन यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, इलेक्शन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी देशभरात 236 निवडणुका लढल्या आहेत. पद्मराजन म्हणाले, की तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राष्ट्रपतीपर्यंतच्या निवडणुकांसह ही त्यांची 237 निवडणूक आहे. त्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की लोक त्यांना भेटून फोटोही काढतात.
Telangana Elections : वायएस शर्मिलांचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, ‘या’ पक्षाला दिला पाठिंबा
अटलबिहारी वाजपेयींना दिले आव्हान
टायरची दुकान चालविणाऱ्या पद्मराजन यांनी सांगितले की 1988 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान मेट्टूर मतदारसंघातून पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. पद्मराजन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पीव्ही नरसिंहराव यांच्या विरोधातही निवडणूक लढली आहे.
निवडणुकींवर एक कोटींचा खर्च
पद्मराजन सांगतात की ते एक होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा आहेत. निवडणूक लढण्याच्या इच्छेमुळे त्यांनी अनेक रेकॉर्डही केले आहेत. यासाठी त्यांनी आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च केले आहेत. पद्मराजन यांनी 2019 च्या निवडणुकीत केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधातही निवडणूक लढली होती. इतक्या निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते 2011 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. या निवडणुकीत त्यांना 6273 मते मिळाली होती.