Telangana Man Who Killed 6: सूड, बदला घेण्याच्या भावनेतून एखाद्या व्यक्ती कुणालाच सोडत नाही. अशीच एक घटना घडलीय. एका 29 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीसह तिच्या घरातील दोन महिलांना, आपली पत्नी, दोन लहान मुले असे सहा जणांचा चाकूने भोसकून खून केला आणि त्यानंतर स्वत: ही आत्महत्या केलीय. हे हत्याकांड कुठे घडले. या हत्याकांडाचे कारण काय आहे हे समजून घेऊया…
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील दैवलागुडा गावात राजकुमार हा कुटुंबासह राहत होता.तो शेतकरी होता. आई-वडिल, पत्नी व दोन लहान मुले असे हसते खेळते कुटुंब होते. त्यांच्या शेजारी आई-वडिलांसह 16 वर्षीय मुलगी राहत होते. या दोन्ही कुटुंबातील काही वाद झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी राजकुमार हा पत्नी व मुलांसह दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. त्याचवेळीविरुद्ध शेजारच्या अल्पवयीन मुलीने पॉक्सो कायद्यानुसार 20 वर्षीय राजकुमारविरुद्ध फिर्याद दिली. राजकुमार विरुद्ध अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात राजकुमारला अटक झाली आणि मागील महिन्यात जामीन मिळाला होता.
जामिन मिळाल्यानंतर आपल्या कुटुंबाला सांभाळण्याएेवजी त्याच्या मनात सूड उगविला. त्याला बदला घ्यायचा होता. त्यातून राजकुमार 10 जुलैला शुक्रवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारात पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी पीडितेचे आई आणि आजीच घरी होती. ते थेट घरात घुसला दोघींची गळे त्याने चाकूने चिरले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला आपल्याबरोबर पाच सहा किलोमीटर नेले आणि पीडितेचा गळा चिरून खून केला. त्यावरच तो थांबला नाही. त्याने स्वत:चे घर गाठले. आधी खून केलेल्या चाकूने त्याने स्वत:ची पत्नी सरिता आणि आपल्या दोन चिमुकल्या मुलांना संपविले आहे.
हत्येनंतर वडिलांना फोन करून दिली माहिती
राजकुमारने सुमारे दोन तासांच्या कालावधीत सहा किलोमीटर अंतरावर सहा जणांचे खून करून हत्याकांड घडविले आणले. त्यानंतर रात्री सुमारे 11.50 वाजता त्याने वडिलांना फोन करून हत्यांची कबुली दिली आणि आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने स्वत:चा मोबाइल फोन बंद करून टाकला. सहा जणांच्या हत्याकांडाने गावात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. परंतु दोन दिवस त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. आरोपीवर दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी रात्री
हैदराबादजवळील रंगारेड्डी जिल्ह्यातील कोथूर मंडलातील पेनजेरला परिसरातील एका रिअल इस्टेट प्रकल्पात स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खातरजमा केल्यांतर हा मृतदेह राजकुमारचा असल्याची ओळख पटली. मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळल्याने आत्महत्येची शक्यता आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बदला घेण्याच्या आगीत राजकुमारने दुसऱ्याचे कुटुंब आणि स्वत:चे कुटुंब संपविले आहे.
हत्याकांडापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला
राजकुमारने घटनेपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो जीवनाला कंटाळल्याचे सांगत आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केलीय. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने त्याच्याकडून पैसे घेऊन त्याची फसवणूक केली. मुलीच्या कुटुंबीयांमुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. आपण त्यांची हत्या करून स्वतःही आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. व्हिडिओमध्ये त्याने संबंधित कुटुंबीयांची नावे घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केलीय.
राजकुमारने आपल्या दोन मुलांना मिळणारी शेतीची जमीन गमावल्याचाही व्हिडिओ दावा केला. मुलीच्या कुटुंबाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठविले, असे राजकुमारने व्हिडिओत म्हटले आहे.
राजकुमारला ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराचे व्यसन
राजकुमारला ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराचे व्यसन होते. त्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते आणि त्यामुळे तो तीव्र मानसिक तणावाखाली होता.ऑनलाइन बेटिंगसाठी तो तब्बल 16 सिम कार्ड आणि अनेक मोबाईल फोन वापरत होता. ऑनलाइन बेटिंगमुळे त्याच्यावर 2 कोटी रुपयांहून अधिक कर्ज झाले होते.राजकुमारच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या वाट्याची शेती विकून कर्ज फेडले होते. त्यानंतरही तो प्रचंड आर्थिक अडचणीत आणि मानसिक तणावात होता, असे पोलिस तपास समोर येत आहे. त्यातून आर्थिक फसवणूक आणि कर्जबाजारीपणामुळे त्याने हे हत्याकांड घडविले असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
