Download App

उन्हाचा चटका वाढला; हवामान विभागाने मुंबईसह ‘या’ सहा जिल्ह्यांना दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई आयएमडीच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले की, 'तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांच्या वर पोहोचल्यावर इशारा

  • Written By: Last Updated:

Heat increased In Maharashtra : महाराष्ट्र राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढायला लागली आहे. उन्हाचा पारा वाढतोय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील (Heat ) सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २६ फेब्रुवारीला उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. बाहेर जाताना पाणी सोबत ठेवण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार असून, त्यामुळे राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे.

Weather Update : राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस  या भागांमध्ये उष्णता वाढणार

मुंबई आयएमडीच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले की, ‘तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांच्या वर पोहोचल्यावर इशारा दिला जातो. या काळात दुपारी बाहेर पडणे टाळावे, बाहेर जाणे आवश्यक असल्यास पाणी सोबत ठेवा. फेब्रुवारीत पारा सामान्यपेक्षा जास्त नोंदवला गेल्याची एका दशकातील ही चौथी वेळ आहे.

राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला असून, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात दिवसाच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे.’ हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात तीव्र उष्मा वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत कोरडे हवामान अनुभवायला मिळेल. हवामान विभागाने या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

उष्माघाताने एकाचा मृत्यू

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मुंबईतील सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३८.४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मुंबई आणि कोकणात सध्या अत्यंत उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत असून, नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. कडक उन्हामुळे सांगलीत सोमवारी (ता.२४) उष्माघाताने एकाचा मृत्यूही झाला.

follow us