लिस्टिंग होताच जिओ बनणार भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी; कोणत्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकणार ?

Jio IPO: आयपीओ 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.

JIO

JIO

Reliance Jio IPO : रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा (The Jio Platforms IPO) आयपीओ 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. हा भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. विशेष म्हणजे शेअर बाजारात लिस्टिंग होताच बाजारमूल्याच्या बाबतीत जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक आणि एलआयसीसारख्या दिग्गज कंपन्यांना जिओ मागे टाकू शकते.


जिओ आयपीओची तारीख आणि किंमत किती?

जिओ प्लॅटफॉर्म्सने 14 ऑक्टोबर रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केला आहे. आयपीओची किंमत श्रेणीही जाहीर केली आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर 1065 ते 1119 रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. अप्पर प्राइस बँडनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ सुमारे 30,213 कोटी रुपयांचा असू शकतो. या आकारमानामुळे हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. आयपीओसाठी 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी शेअर अलॉटमेंट होण्याची शक्यता आहे. तर 28 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्टिंग होऊ शकते.

जिओचे बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपये पार जाणार?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या अप्पर प्राइस बँडनुसार कंपनीचे मूल्यांकन सुमारे 108.3 अब्ज डॉलर, म्हणजेच जवळपास 10.3 लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेअर बाजारात प्रवेश करताच कंपनीचे बाजारमूल्य देशातील अनेक दिग्गज कंपन्यांपेक्षा अधिक असू शकते. सध्या बाजारमूल्याच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील आघाडीची कंपनी आहे. त्यानंतर भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेचा क्रमांक लागतो. जिओ प्लॅटफॉर्म्सचे बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपयांच्या आसपास राहिल्यास कंपनी चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकते. विशेष म्हणजे, लिस्टिंगच्या वेळी शेअरला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळून प्रीमियमवर व्यवहार सुरू झाल्यास जिओ प्लॅटफॉर्म्स एचडीएफसी बँकेलाही मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारमूल्य हे लिस्टिंगच्या वेळी शेअरची किंमत आणि बाजारातील व्यवहारांवर अवलंबून असेल.

भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत होणार मोठा बदल?

सध्या उपलब्ध असलेल्या बाजारमूल्याच्या आकडेवारीनुसार देशातील आघाडीच्या कंपन्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज — 16 लाख 55 हजार कोटी रुपये
भारती एअरटेल — 11 लाख 55 हजार कोटी रुपये
एचडीएफसी बँक — 11 लाख 23 हजार कोटी
आयसीआयसीआय बँक — 10 लाख 1 हजार कोटी रुपये
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) — 8 लाख 87 हजार कोटी रुपये
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) — 8 लाख 51 हजार
बजाज फायनान्स — 6 लाख 2 हजार कोटी रुपये
लार्सन अँड टुब्रो — 5 लाख 3 हजार कोटी रुपये
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) — 4 लाख 98 हजार कोटी रुपये
इन्फोसिस — 4 लाख 50 हजार कोटी रुपये

6 जी तंत्रज्ञानाकडे जिओची वाटचाल-आकाश अंबानी
जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी आयपीओसंदर्भातील पत्रकार परिषदेत कंपनीच्या भविष्यातील तंत्रज्ञानविषयक योजनांबाबत माहिती दिली. जिओचे उद्दिष्ट नवीन पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी सॉफ्टवेअर अपग्रेडच्या माध्यमातून पुढील पिढीच्या 6जी मोबाइल कम्युनिकेशन तंत्रज्ञानाकडे वाटचाल करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिओने देशभरात मोठे दूरसंचार नेटवर्क उभारले आहे. कंपनीकडे 3 लाख 60 हजारांहून अधिक टेलिकॉम टॉवर्स आणि 10 लाख रूट किलोमीटरपेक्षा जास्त फायबर नेटवर्क असल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version