दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला (NIA) मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा दहशतवादी कट रचणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आमिर रशीद अली असं अटक करण्यात आलेला आरोपीचच नाव आहे. स्फोटात वापरलेली कार त्याच्या नावावर नोंदणीकृत होती. एनआयएने त्याला दिल्लीत अटक केली. सुरुवातीला दिल्ली पोलीस स्फोटाचा तपास करत होते. परंतु, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. एनआयएने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली, ज्यामध्ये आमिरला अटक करण्यात आली.
आमिर हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. त्याने पुलवामा येथील उमर उन नबी नावाच्या व्यक्तीसोबत सहकार्य करून हल्ल्याची योजना आखली होती. आमिर दिल्लीत कार खरेदी करण्यास मदत करण्यासाठी आला होता, जी नंतर स्फोटासाठी आयईडी (बॉम्ब बनवण्याचे उपकरण) म्हणून वापरली गेली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्युलच्या तपासात मोठ यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकला आणि तिथून हरियाणातील एक महिला डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अटक केलेल्या या डॉक्टरचं नाव प्रियंका शर्मा असं आहे. प्रियंका हरियाणातील रोहतक इथली रहिवासी होती. अनंतनागमधील मलखानाग परिसरात ती भाड्याच्या घरात राहत होती. तपासादरम्यान फोन कॉल ट्रेलमध्ये प्रियंकाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकला. घटनास्थळावरून एक मोबाइल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलं आहे. फोन आणि सिम कार्ड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे हरियाणा पोलिसांची टीम तिच्या कुटुंबाची माहिती आणि इतर तपशील गोळा करणार असल्याचं कळतंय.
