UCC In Uttarakhand : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला समान नागरी कायदा (UCC In Uttarakhand) अखेर उत्तराखंडमध्ये मंजूर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक सादर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केलं असून यासंदर्भातील माहिती धामी यांनी एक्सद्वारे दिली आहे.
विधानसभा में ऐतिहासिक "समान नागरिक संहिता विधेयक" पेश किया। #UCCInUttarakhand pic.twitter.com/uJS1abmeo7
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) February 6, 2024
उत्तराखंड विधानसभेत मंगळवारी समान नागरी संहिता (UCC) विधेयक सादर करण्यात आले. यूसीसी विधेयकासाठी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक मांडले. हे विधेयक मांडल्यानंतर सीएम धामी यांनी सोशल मीडिया साइट X वर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले, ऐतिहासिक ‘समान नागरी संहिता विधेयक’ विधानसभेत मांडले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. राज्य मंत्रिमंडळाने रविवारी यूसीसीचा मसुदा स्वीकारला आणि विधेयकाच्या रूपात सभागृहात मांडण्यास मान्यता दिली आहे. दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते यशपाल आर्य म्हणाले की, सरकारच्या हेतूवर शंका आहे. बिलाची प्रत अपूर्ण आढळून आली असून आता यावर चर्चा होणार आहे. अशा परिस्थितीत एवढ्या वेळात आपण काय चर्चा करणार आणि काय वाचणार? असं आर्य यांनी म्हटलं आहे.
चार खंडांमध्ये ७४० पानांचा हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे..