Download App

खबरदार! ‘व्हॉट्सअप’वर ज्युनियर्सना त्रास दिला तर.. UGC चा गंभीर इशारा; नव्या नियमांत काय ?

देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना रॅगिंग फ्री कॅम्पससाठी तयार केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

UGC Strict for Ragging Free Campus : युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात युजीसी. याच युजीसीने (UGC) काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नवीन सत्र सुरू होण्याआधी देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना रॅगिंग फ्री कॅम्पससाठी तयार केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी (University Grants Commission) तयार करण्यात आलेले नियम कोणत्याही परिस्थितीत लागू करावेच लागतील असेही युजीसीने स्पष्टपणे म्हटले आहे.

देशातील महाविद्यालयांत रॅगिंगचे प्रकार वाढले आहेत. नवीन विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांची रॅगिंग करण्याचे प्रकार घडतात. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. आता या गोष्टी टाळण्यासाठी युजीसीने काही कठोर नियम तयार केले आहेत. आधी रॅगिंग कॉलेज कॅम्पस किंवा होस्टेलमध्ये होत होती. पण तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात रॅगिंगची पद्धत बदलली आहे.

सिनियर विद्यार्थी कुणालाही न कळता गुपचूपपणे व्हॉट्सअप ग्रुप तयार करतात. यात नवीन विद्यार्थ्यांचे नंबर अॅड करतात नंतर याच ग्रुपमध्ये मेसेज टाकून विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो अशा तक्रारी युजीसीला मिळाल्या होत्या. ग्रुपमध्ये अशा पद्धतीने मेसेज टाकून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात होता. या मेसेजमध्ये विद्यार्थ्यांना आजिबात अपेक्षित नाही अशा गोष्टी ऐकायला आणि करायला भाग पाडले जात होते.

लोकपालांची नियुक्ती न करणं भोवलं; राज्यातील 7 तर देशातील 157 विद्यापीठांवर UGC कडून कारवाई

रॅगिंग विरोधात युजीसी कठोर

युजीसीने आपल्या गाइडलाइन्समध्ये गंभीर इशारा दिला आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे ज्यूनियर विद्यार्थ्यांना त्रास दिला गेला तर या प्रकाराला रॅगिंग मानले जाईल. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला कुणी जर व्हॉट्सअपवर मेसेज करून धमकावत असेल, मेसेज पाठवत असेल किंवा एखादा ग्रुप तयार करून त्रास देत असेल तर या प्रकारांची तक्रार करता येईल. यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

.. तर महाविद्यालयांचं अनुदान बंद

फक्त विद्यार्थीच नाही तर युजीसीने महाविद्यालयांवरही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही महाविद्यालयांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. जर एखादी संस्था रॅगिंग रोखण्यात अपयशी ठरत असेल तर या संस्थेवर कठोर कारवाई होऊ शकते. या संस्थेला मिळणारी सरकारी मदत देखील थांबवली जाऊ शकते.

रॅगिंगच्या जुन्या सवयी रडारवर

युजीसीने रॅगिंगच्या काही जुन्या पद्धतींची यादी तयार केली आहे. या पद्धतींचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न याआधीही करण्यात आला होता. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यूनियर विद्यार्थ्यांना धमकावणे, सिनियर्सचे म्हणणे ऐकले नाही तर सोशल बॉयकॉट करणे, जबदस्तीने केस कापणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करायला लावणे किंवा सर्वांसमोर अपमानित करणे असे काही जुने प्रकार सांगता येतील. अशा प्रकारांनी मुलांना मानसिक आणि शारीरिक धक्का बसतो. असे प्रकार रॅगिंगच्या नियमांचे उल्लंघन असून ते सहन केले जाणार नाहीत असा इशारा युजीसीने दिला आहे.

नवीन विद्यार्थ्यांना दिलासा

जे विद्यार्थी नव्याने कॉलेज किंवा विद्यापीठात जाणार आहेत त्यांच्यासाठी युजीसीचा हा निर्णय दिलासा देणारा आहे. कारण याच नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंगला सामोरे जावे लागते. युजीसीच्या या नव्या नियमांमुळे रॅगिंगच्या घटना कमी होतील आणि विद्यार्थी कोणत्याही भीतीविना शिक्षण घेऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक! UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला

follow us