Download App

“महिला खासदारांकडे बघून फ्लाईंग किसचा इशारा केला”; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किसचा इशारा केला, असा मोठा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. (Union Minister Smriti Irani alleged that Rahul Gandhi gave flying kisses to women MPs)

नेमके काय घडले?

विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या भाषणानंतर भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला.

यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला. राहुल गांधींनी असभ्य हावभाव केले. सभागृहातून बाहेर पडताना त्यांनी फ्लाइंग किसचे इशारे आणि हावभाव केले, असा आरोप इराणी यांनी केला. या घटनेबाबत भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. या आरोपांमुळे संसदेतील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

स्मृती इराणी म्हणाल्या, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्यापूर्वी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी सभागृहातून जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केले. महिला असलेल्या खासदार महोदयांना फ्लाइंग किस देऊन निघून गेले. हे वर्तन देशाच्या सर्वोच्च सभागृहात कधीच पाहायला मिळाले नव्हते. हे नेमके कोणत्या खानदानाचे लक्षण आहे, हे संपूर्ण देश बघत आहे, असंही त्या म्हणाल्या.

 जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर..

स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, यांच्याच आघाडीतील एका नेत्यानं म्हटलं होतं की भारताचा अर्थ केवळ उत्तर भारत आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या साथीदाराच्या वक्तव्याचे खंडन करावे. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरात जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले होते. जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे, गांधी कुटुंबात हिंमत असेल तर त्यांनी याचे खंडन करून दाखवावे, असे आव्हानही स्मृती इराणी यांनी दिले.

Tags

follow us