Download App

Elvish Yadav : .. तर मुक्काम थेट तुरुंगातच! काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा?

Elvish Yadav : उत्तर प्रदेशच्या नोएडातील युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विनर एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव अधिनियमांतील कलमांतर्गत सापांच्या विषाचा व्यापार करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. देशातील सापांना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या तरतुदींनुसार संरक्षण देण्यात आले आहे. परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि वन्यजीव अवैध व्यापारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सापांना संरक्षण दिले जाते. जिवंत साप, सापाचे विष, सापाच्या कातडीचा व्यापार अशा प्रकरणात कायद्यांतर्गत कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधिताची तुरुंगात रवानगी होऊ शकते. अशा परिस्थितीत आता एल्विश यादव अडचणीत आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाल्यास त्याला कोठडीतही जावे लागू शकते.

भारतीय कायद्यानुसार साप संरक्षित वन्यप्राणी म्हणून सूचीबद्ध आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या विविध अनुसूची अंतर्गत संरक्षित सापांचे विष आणि त्यांच्या अवयवांची शिकार करणे, त्यांना ताब्यात घेणे हा गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलमांनुसार कोणत्याही वन्यप्राण्याला पकडणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे हा कायद्याच्या कलम 9 नुसार गुन्हा मानला जातो. कायद्यात सापांच्या बचावाची तरतूद नाही मात्र सापांना पकडणे हे शिकार मानले जाते.

Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

लक्षात ठेवा, सापांना कशाही पद्धतीने पकडले तरी शिकारच

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, कोणत्याही प्रकारे सापांना पकडणे शिकार मानले गेले आहे. म्हणजे, घरात साप निघाला तर त्याला पकडून जंगलात सोडणे देखील शिकार मानले जाते. सापाला पकडणे हा भारतात अपराध मानला जातो. या कायद्याच्या कलम 11 आणि 12 अंतर्गत शिकारीची परवानगी देण्याची तरतूद आहे. हे मुख्य वन्यजीव वॉर्डन किंवा अधिकृत अधिकाऱ्याद्वारे लिखित स्वरूपात जारी केले जाते. त्यामुळे कोणत्याही बचावकर्त्याने कोणत्याही प्रकारच्या बचाव कार्यात सहभागी होण्याआधी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आरोप झाल्यावर निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल

वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत सापांच्या शिकारीचा संशय तसेच आरोप झाला तर गुन्हा दाखल करण्यात येईल. संबंधिताला तपास अधिकारी किंवा कोर्टासमोर आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. कायद्यातील तरतुदींनुसार निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपींवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे सापांचे संरक्षण करणाऱ्या लोकांकडे अधिकृत परवाना असणे गरजेचे आहे.

अत्याचार रोखण्यासाठी कायदा

देशात मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1972 मध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा पास केला. या कायद्यात 2003 साली सुधारणा करण्यात आली. आता त्याचे नाव भारतीय वन्यजीव संरक्षण सुधारणा कायदा 2002 आहे. या सुधारित कायद्यात सापांसह सर्व वन्यप्राण्यांची शिकार किंवा छळ केल्याप्रकरणी दंड आणि दंडाची तरतूद अधिक कडक करण्यात आली आहे. डिसेंबर 2022 मध्ये राज्यसभेने वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 2022 मंजूर केले. यामध्ये वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

तर तीन वर्षांचा तुरुंगवास 

वकिल प्रत्युष कुमार म्हणतात, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 16 (सी) नुसार, सापांना इजा पोहोचवल्याप्रकरणी एल्विश यादव आणि अन्य आरोपींवर कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. आरोपीला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. अशा परिस्थितीत त्याला तपासी अधिकाऱ्यांसमोर पुरावे सादर करावे लागतील.

 

Tags

follow us