मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, “या अपघाताची चौकशी होईल. चौकशी नंतर खरे कारण समोर येईल अशी अपेक्षा करू या. पण या अपघातामुळे रेल्वेला भेडसावणाऱ्या मोठ्या समस्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यात वंदे भारत ट्रेनचा सरसकट अट्टहास करणे याचा गांभीर्याने विचार केंद्र सरकारला करावा लागेल, असं परखड मत माजी लोको पायलट यतिन ढाके यांनी व्यक्त केले आहे. (vande bharat express and Odisha train tragedy connection)
लेट्सअप मराठीशी बोलताना यतिन ढाके म्हणाले, स्वतंत्र यंत्रणा तयार न करता जुन्याच यंत्रणा अद्ययावत करुन त्यावर अतिवेगाचा अट्टहास हा यापुढे मोठ्या अपघाताना निमंत्रण ठरेल. अती वेग, वंदे भारत ट्रेनचा राजशिष्टचार, अतिरिक्त मालगाड्यांचा आग्रह आणि रेल्वेतली वाढलेली ठेकेदारी अशा अनेक कारणांचा या रेल्वे अपघाताच्या निमित्ताने विचार झाला पाहिजे. जेणेकरुन यापुढचे असे अपघात टळू शकतील.
ओरिसा जिल्हयात ज्या मार्गावर हा अपघात झाला तया मार्गावर 20 मे रोजी पहिली वंदे भारत ट्रेन चालवण्यात आली. या मार्गाची टेस्टिंग करण्यासाठी साधारण गेल्या अनेक महिन्यावासून गाड्यांचा वेग वाढवून चाचण्या करण्यात आल्या आहे. देशभरात सर्वच ट्रॅक वर 110 वरून 130 पर्यंत स्पीड वाढविण्याचा अट्टहास सध्या केला जात आहे. तो पूर्णपणे अशास्त्रीय आहे.
भारतात भौगोलिक दृष्ट्या रेल्वे रूळ असलेल्या जागेचा प्रदेश भूषभूषित आणि मऊ प्रदेश आहेत. याठिकाणी अतिरिक्त खडी टाकून हा भाग टणक करण्यात आला आहे. या भागात 110 किमी प्रतितास वेगाने प्रवास होऊ शकतो. त्या ठिकाणी 130 किमी वेगाच्या चाचण्या केल्या जात आहेत. अति वेगाच्या चाचणीच्या वेळी वेग वाढवल्यास जमिनीचे कंपनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ट्रॅक अलायनमेंट बिघडल्यास ट्रेन रुळावरून उतरकण्याचा धोका अधिक वाढतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्याकडे राजधानी एक्सप्रेस वर्षानुवर्षे अतिवेगाने का चालवली जाते? याचे उत्तर भोपाळ ते दिल्ली रेल्वे ट्रॅक अतिशय कठीण दगडावर तयार झाला आहे. त्यामुळे तेथे कंपन कमी होतात. हा नियम तुम्ही भारतात कुठेही सरसकट लावू शकत नाही. रेल्वे ट्रॅकच्या नवीन मार्गांचा आणि वेगाचा अभ्यास करण्यासाठी CRS म्हणजेच Commissioner of Railway Safety हे स्वतंत्र पद आहे. अतिशय जोखमीच्या या पदावर रेल्वे मंत्रालयाने दबाव टाकू नये यासाठी हे पद नागरी उड्डायन मंत्रालयाच्या नियंत्रणात आहेत.
रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅक्सचा वेग वाढवताना आणि नवीन मंजुरी देताना अतिशय बारकाईने अभ्यास केला जातो. वर्षानुवर्षे अभ्यास केल्यानंतर ट्रॅकवरील वेग आणि नवीन ट्रॅक्सबाबत निर्णय होतो. यपूर्वीच्या काळात रेल्वेच्या मंजुरीसाठी वर्षानुवर्षे लागायची हे त्याचे मूळ कारण आहे. हल्ली या कार्यालयाकडून अतिजलद परवानगी कशा दिल्या जातात? ठेकेदारांच्या कामांच्या अतिजलद परवानग्या कशा? याविषयी सर्वांना आश्चर्य आहे.
गेले अनेक वर्ष म्हणजे 15 ते 20 वर्षापासून आपल्याकडे असलेले लोको पायलट 110 पर्यंत वेग हाताळत आहेत. हा वेग हाताळताना सिग्नलकडे पाहणे आणि इंजिन बोर्डा वरचे बटण हाताळणे हे सवयींचे झाले आहे. हा स्पीड जर 130 किमी प्रतितास गेल्यास सिग्नल पाहणे आणि बटण हाताळणे याचा वेळेत कमालीची घट होते आणि लोको पायलट विचलित होऊ शकतात.
स्पीड वाढवताना या लोको पायलटला ट्रेनिंग देण्यात येते. पण 20 वर्षाची सवय 2 महिन्यात बदलते, हे शक्य होत नाही. यासाठी असलेली सुपरसायको टेस्ट करावी लागते. ही टेस्ट आता राजधानीच्या लोको पायलट साठी सुरु करण्यात आली आहे. ती ट्रेनिंग इतर लोको पायलटला देण्यासाठी आणखी सात ते आठ महिन्यांचा कालावधी आहे.
कमी माणसात अधिक काम हा देखील विषय रेल्वेसाठी डोकेदुखी बनला आहे. पुर्वी 1 ड्युटी झाली तर 24 तासांची सुटी देण्यात येत होती. ती आता 16 तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे अति प्रवास, कमी झोप, लांब पाल्यांच्या लोको पायलटच्या मानसिकतेवर प्रभाव पडतोय का? याचा विचार झाला पाहिजे.
कमी लोको पाललट असल्याने जो ड्युटीवर असेल त्याला लांबापल्याची जबाबदारी सोपवली जाते. यापूर्वी अनुभवी असलेल्या लोको पायलटला अतिवेगवान आणि लांब पाल्याची गाडी सोपवली जायची. आता अनानुभवी लोको पायलटकडे अति वेगवान गाडीची जबाबदारी सोपवली जाते आहे. हे धोकादायक आहे.
गेल्या काही वर्षात देशात रेल्वेने मालवाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. मालवाहतुकीमुळे रेल्वे नफ्यात आली आहे. हे समोर असल्याने मालवाहतूक करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. समजा एका मार्गावर 30 मालवाहतूक गाड्या धावत असतील तर तेथे आता 40 ते 45 गाड्यांपर्यंत वाहतूक वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मालवाहतूक करताना अतिरिक्त वजन वाहून नेण्याचा आग्रह हा देखील घातक ठरतोय. यामुळे ट्रॅक खराब होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
आता वंदे भारत ट्रेन सुरु केली आहे. ट्रॅकची क्षमता नसताना रेल्वेचा वेग वाढविण्याचा अट्टहास होत आहे. एका राज्यात एक वंदे भारत ट्रेन सुरु करताना त्याच्या तयारीसाठी DRM, GM आणि सीआरबी असे सर्वच मोठे अधिकारी व्यक्तिशः उपस्थित राहतात. . यामुळे रेल्वेतील अनेक लहान-मोठ्या दुरुस्त्या आणि कामांकडे दुर्लक्ष होत का? याचा विचार झाला पाहिजे.
सध्या रेल्वेमध्ये गँगमन पासून सिग्नल या सर्व जबाबदारी खासगी ठेकेदारांकडे देण्यात आल्या आहेत. या ठेकेदारांचे टेक्निकल ज्ञान किती यावर प्रश्नचिन्ह आहे? पूर्वी एका गँगमनकडे 3 किमी ट्रॅक तपासणी जबाबदारी दिलेली असायची. रुळाचे प्रत्येक लॉक व्यक्तिगत चेक केले जायचे. तपासणीची ही काम आता मशिनरींच्या साह्याने केली जातात. ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या तपासणीमध्ये पारदर्शता राहिली आहे का याचा विचार झाला पाहिजे. रेल्वेने एका दिवसात करोडो लोक प्रवास करतात. यांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी निरपेक्ष विचार व्हावा एवढीच अपेक्षा आल्याचे ढाके यांनी सांगितले.