Vice Presidential Election Voting Today : देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार? यासाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या तर्फे सी. पी. राधाकृष्णन उमेदवारी करत आहेत, तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभं केलं आहे.
– उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा (Vice Presidential Election) आणि राज्यसभेतील सर्व खासदार मतदान करतात.
– राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा (NDA Vs India Aghadi) अधिकार असतो.
– या निवडणुकीत व्हिप जारी केला जात नाही आणि मतदान पूर्णपणे गुप्त पद्धतीने होतं.
– खासदारांना पक्षरेषेपेक्षा स्वतंत्रपणे मतदान करण्याची मुभा असते, पण बहुतेक वेळा ते पक्षाच्या भूमिकेनुसारच मतदान करतात.
– मात्र, याआधीच्या निवडणुकांमध्ये क्रॉस-व्होटिंग झाल्याची उदाहरणे आहेत. यावेळीही त्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सध्या लोकसभेत 542 आणि राज्यसभेत 239 असे मिळून एकूण 781 खासदार आहेत. त्यानुसार विजयासाठी किमान 391 मतांची गरज आहे. एनडीएच्या गटात 425 खासदार आहेत. त्यात आणखी काही पक्षांचा पाठिंबा मिळण्याची त्यांना खात्री आहे. वाईएसआर काँग्रेस (YSRCP) ने स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या 11 खासदारांमुळे एनडीएची ताकद आता 436 मतांवर पोहोचली आहे. आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल एनडीएला मतदान करण्याची शक्यता आहे.
बीजेडी (7 खासदार) एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख नवीन पटनायक सध्या दिल्लीमध्ये असून, या संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, बीआरएस (4 खासदार) एनडीएला उघड पाठिंबा देणार नाही. कारण काही महिन्यांत जुबली हिल्स मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. तिथे मुस्लिम मतदारसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे बीआरएस मतदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधकांकडे सुमारे 324 मतं आहेत. काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या खासदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे निकालात फरक 100 ते 125 मतांचा राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सन 2022 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या मार्गरेट अल्वा यांचा 346 मतांनी पराभव केला होता. मात्र, यावेळी विरोधकांची ताकद पूर्वीपेक्षा जास्त असल्यामुळे विजयाचा फरक एवढा मोठा राहणार नाही, असे राजकीय सूत्रांचे मत आहे. दोन्ही आघाड्या एकही मत रद्द होऊ नये, यासाठी आपल्या खासदारांना विशेष मार्गदर्शन करत आहेत. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी खासदारांना मतदानापूर्वी ट्रेनिंग देण्यात आले आहे. एनडीएला काही अतिरिक्त मतांची अपेक्षा असून, विरोधकही आपला आकडा घट्ट ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.