Change dil ka angle, not camera angle: Priyanka Gandhi’s big attack on PM Modi : पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्याचा नाही, तर ह्रदयाचा अँगल बदलण्याची गरज आहे. ते वास्तवापासून दूर गेले आहेत, अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केली आहे. लोकसभेत पेपर लीकविरोधी कायद्यातील दुरुस्तीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर नवी समिती नेमून उपयोग होणार नाही. राधाकृष्णन समितीच्या शिफारशी आजपर्यंत लागू झालेल्या नाहीत. आता पुन्हा समित्या स्थापन करून प्रश्न सुटणार नाहीत. पंतप्रधानांनी आपल्या सल्लागारांना बदलण्याची गरज आहे. कॅमेऱ्याचा अँगल नव्हे, तर ह्रदयाचा अँगल बदलला पाहिजे,” असा टोला देखील प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला.
‘AK-47 चालवण्याचा आदेश कोणी दिला?’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “एका निष्पाप मुलीवर दडपशाही करण्याची गरज काय होती? विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीचार्ज, वॉटर कॅनन आणि AK-47 वापरण्याची गरज काय होती? ते दहशतवादी होते का?” असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना केला. तसेच, पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला? देशातील पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण देश सरकारकडे उत्तर मागत आहे असेही त्या म्हणाल्या. हजारो विद्यार्थी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले होते. त्यांची मागणी फक्त पेपर लीक रोखणे, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार थांबवणे आणि जबाबदार मंत्र्यावर कारवाई करण्याची होती. पण सरकारला देशातील तरुणांची भीती का वाटते? त्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
LIVE: Smt @priyankagandhi | Discussion on the Public Examinations Amendment Bill 2026 | Lok Sabha https://t.co/MR3biP0YQ8
— Congress (@INCIndia) July 28, 2026
‘दहा वर्षांत १५२ पेपर लीक, एकालाही शिक्षा नाही’
परीक्षा व्यवस्थेवर टीका करताना प्रियंका गांधी यांनी दावा केला की, गेल्या दहा वर्षांत १५२ पेपर लीक झाले, मात्र एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांची ओळख फेस रिकग्निशनद्वारे सार्वजनिक केली जात आहे, पण पेपर लीक करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरही टीका करत, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना रस्त्यावरून हटवू शकता, पण त्यांच्या प्रश्नांना नाही
भाषणादरम्यान प्रियंका गांधी यांनी नव्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवरही टीका केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत हे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्यांनी पुराव्याशिवाय व्यक्तिचरित्र हनन करणारी विधाने केल्याचा आरोप केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही अशा प्रकारची विधाने सभागृहात करू नयेत, असे सांगितले. काही काळ गदारोळ झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पुन्हा आपले भाषण सुरू केले.
भाषणाच्या शेवटी प्रियंका गांधी म्हणाल्या, विद्यार्थ्यांना रस्त्यावरून हटवू शकता, पण त्यांच्या प्रश्नांना नाही. प्रत्येक लाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कमी आणि सरकारच्या विश्वासार्हतेवर अधिक बसली आहे. देशाचा तरुण न्याय मागत आहे, भीक नाही. सरकारने केवळ शिक्षा वाढवण्यापेक्षा पेपर लीक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा मिळवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
