Video : मोदींचे 200 अधिकारी आम्हाला आतली माहिती देत आहेत…राहुल गांधींचा मोठा दावा

Rahul Gandhi On Gyanesh Kumar मतदारयाद्यांमधील कथित घोळ आणि निष्पक्षतेवरून मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा...

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Modi 200 officers in touch with us Says Rahul Gandhi : निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. “सरकारचे सुमारे 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत आणि आम्हाला आतली माहिती देत आहेत,” असा दावा राहुल गांधी यांनी केला. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली असून, अधिकारी वर्ग नेमकी कोणती माहिती देत आहेत याबाबत राहुल यांनी अधिकचा खुलासा केलेला नाही. यावेळी राहुल गांधी यांनी  मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता आणि निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आता या कथित अनियमिततांविरोधात इंडिया आघाडीचे खासदार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं राहुल यांनी यांनी सांगितलं.

“दिल्लीला किल्ल्याचं स्वरूप; आंदोलकांना रोखलं जातंय”

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. आंदोलकांना राजधानीत येण्यापासून रोखलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. रेल्वे आणि बसने दिल्लीला येणाऱ्या लोकांनाही अडवलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. दिल्लीला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं आहे. सर्वत्र पोलीस तैनात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. सरकार आंदोलन दडपण्याचा जितका प्रयत्न करेल, तितकाच हा मुद्दा अधिक चर्चेत येईल, असा दावाही त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनासाठी 20 ते 30 हजार पोलीस तैनात असावेत, अशी उपरोधिक भूमिका मांडत सरकारने या मुद्द्याकडे देशाचं लक्ष वेधून घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

50 टक्के पोलीस आमच्या आंदोलनाच्या समर्थनात

राहुल गांधी यांनी दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) यांच्यातील जवानांबाबतही दावा केला. तरुण आंदोलकांवर होत असलेल्या कारवाईबद्दल काही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलं. सुमारे 50 टक्के पोलीस कर्मचारी आमच्या आंदोलनाचं समर्थन करत आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तरुणांवर कारवाई का केली जात आहे, असा प्रश्न पोलीस कर्मचारी विचारत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत?

मतदारयाद्यांमधील कथित घोळ आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरून राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यावीत, अशी  मागणी करत केंद्र सरकार ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आंदोलन करणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई घडवून आणल्याचा आरोप करत सरकार या आंदोलनाला रोखून मोठी चूक करत असल्याचं ते म्हणाले.

CJI यांची भेट झाली नाही; आता सर्वोच्च न्यायालयात धाव

राहुल गांधी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, सरन्यायाधीशांनी त्यांना याचिका दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर आता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारयाद्यांची विश्वासार्हता आणि लोकशाहीशी संबंधित प्रश्न न्यायालयासमोर मांडले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

SIR वरून संघर्ष आणखी वाढणार?

मतदारयाद्यांची विशेष सखोल तपासणी अर्थात SIR वरून आधीच राजकीय वातावरण तापलं आहे. मतदारयाद्या अधिक अचूक करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. दुसरीकडे, या प्रक्रियेत पात्र मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता असल्याची चिंता विरोधकांनी व्यक्त केली आहे. आता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारमधील 200 अधिकारी संपर्कात असल्याचा दावा केला असून, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता न्यायालयीन पातळीवरही पुढे जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version