TVK Government Formation : तमिळनाडूच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक वळण आले आहे. सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कषगम (TVK) पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांनी (CPI, CPM) आणि VCK ने विजय यांच्या पक्षाला समर्थन जाहीर केल्यामुळे आता नवीन युती आघाडी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली आहे.
असा गाठला जादूचा आकडा
तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या गाठण्यासाठी विजय यांच्या पक्षाला मित्रपक्षांची गरज होती. आता हे समीकरण TVK १०८ जागा (यात विजय यांनी स्वतः दोन जागांवर विजय मिळवला आहे). काँग्रेसचे ५ आमदार, CPI, CPM आणि VCK: ६ आमदार असे एकूण संख्याबळ १०८ + ५ + ६ = ११९ आमदार असे जुळले आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा या युतीने पार केला असून, थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता पूर्णपणे सुकर झाला आहे.
काँग्रेस आणि डाव्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) सरचिटणीस डी. राजा यांच्याशी चर्चा करून तमिळनाडूमध्ये एक धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गुरुवारी टीव्हीके नेते निर्मल कुमार यांनी सीपीआईचे प्रदेश सचिव एम. वीरपांडियन यांची भेट घेतली होती. या चर्चेनंतर आज डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसने विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
आज संध्याकाळी मोठी घडामोड
आज संध्याकाळी ४:३० वाजता सर्व समर्थक पक्षांचे नेते एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. याच काळात विजय यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल आणि विजय यांची या आठवड्यातील ही तिसरी भेट असेल.
द्रविडी राजकारणात तिसरा पर्याय यशस्वी
दशकानुदशके तमिळनाडूच्या राजकारणात DMK आणि AIADMK या दोनच पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, विजय यांच्या रूपाने राज्याला एक प्रबळ तिसरा पर्याय मिळाला आहे. विशेषतः तरुणांनी विजय यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले असून, प्रस्थापित राजकारणाविरुद्ध एक नवा कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
राज्यपाल विजय यांना कधी शपथविधीसाठी आमंत्रित करतात आणि मंत्रिमंडळात इतर पक्षांचा सहभाग कसा असेल, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ‘रील लाईफ’ मधील सुपरस्टार आता ‘रिअल लाईफ’मध्ये मुख्यमंत्री म्हणून कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता तमिळ जनतेमध्ये शिगेला पोहोचली आहे.
#WATCH | Tamil Nadu: TVK workers and supporters celebrate outside the party headquarters in Chennai, amid reports of CPI, CPI(M) and VCK extending support to the party. pic.twitter.com/y4XOm222al
— ANI (@ANI) May 8, 2026
