नबीन यांच्या टीममध्ये वर्णी लागताच भाजपकडून तावडेंना आणखी एक मोठी जबाबदारी

Vinod Tawde appointed In-charge Of UP भाजपने ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Letsupp Image (4)

Letsupp Image (4)

BJP National President Nitin Nabin Appointed New State In Charges : भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नवीन राष्ट्रीय संघटनात्मक टीम स्थापन केल्यानंतर, पक्षाने आज (दि.18) तीन राज्यांच्या नवीन प्रभारींचीही घोषणा केली आहे. यात विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे, सतीश पुनिया यांची पंजाबचे आणि तरुण चुघ यांची गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  काल (दि.17) भाजपने तावडे यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली होती. तर, सतीश पुनिया यांचीही राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली होती. तर, राज्यसभा खासदार तरुण चुघ यांची राष्ट्रीय कार्यालय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांत दोन याद्या जाहीर झाल्याने, भाजपने 2027 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

उत्तर प्रदेशात तावडे सक्रिय

विनोद तावडे गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात सक्रियपणे सहभागी आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान, त्यांनी नावांची एक यादी तयार करून केंद्रीय नेतृत्वाला सादर केली होती. नंतर, तावडे यांनी संघटनात्मक विस्तारातही सक्रिय भूमिका बजावली. ते भाजपच्या जवळपास प्रत्येक संघटनात्मक बैठकीला उपस्थित होते. यामुळे ते प्रभारी होऊ शकतात अशी अटकळ बांधली जात होती.

भाजपमधील महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्याचा तावडेंना मोठा अनुभव

विनोद तावडे यांचा जन्म 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते बाळा आपटे आणि मदनदास देवी यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. पुढे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे त्यांचे प्रेरणास्थान बनले. तावडे यांनी यापूर्वी बिहारसह अनेक राज्यांमध्ये भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.

– 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विविध राज्यांतील बैठका आणि समन्वयाचे काम करताना एनडीएतील मित्रपक्ष तसेच पाठिंबा देणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

– 2025 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली. यावेळी एनडीएतील घटक पक्ष आणि इतर समर्थक पक्षांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले.

– 2020 मध्ये हरियाणाचे राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यानंतर 2022 मध्ये बिहारची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. बिहारच्या राजकारणात एनडीएला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची रणनीतिक भूमिका बजावली. 2023 मध्ये राजद-जदयू सरकारची साथ सोडून एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या रणनीतीची विशेष चर्चा झाली.

– तावडेंच्या मार्गदर्शनाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएने प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या ऐतिहासिक विजयातही त्यांचे संघटनात्मक आणि रणनीतिक योगदान महत्त्वाचे ठरले.

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. चंदीगड महापालिका निवडणुकीत भाजपच्या सलग यशामागे त्यांच्या संघटनात्मक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा राहिला.

– ‘संघटन पर्व 2024’ अंतर्गत भाजपच्या राष्ट्रीय सदस्यता अभियानाचे प्रभारी म्हणून त्यांनी देशभरातील मोहिमेचे नेतृत्व केले. अवघ्या 15 दिवसांत 5 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका राहिली. याशिवाय उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

– तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन श्रेणीतील लोकसभा मतदारसंघांसाठी स्टार प्रचारकांच्या दौऱ्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी तावडेंनी सांभाळली आहे. याशिवाय त्रिपुरा आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

– ‘मन की बात’, ‘हर घर तिरंगा’, ‘चांद्रयान’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ यांसारख्या विविध राष्ट्रव्यापी अभियानांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी काम केले. या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचा व्यापक स्तरावर प्रचार आणि समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

– ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमध्ये युद्धाच्या काळात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठीही त्यांनी काम केले. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मदत आणि समन्वय साधण्यात त्यांचा सहभाग राहिला.

– प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि प्रधानमंत्री स्वामित्व योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांच्या राष्ट्रीय पातळीवरील अंमलबजावणीच्या देखरेखीतही त्यांनी भूमिका बजावली.

– गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तराखंड, दिल्ली यांसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक कामकाज हाताळण्याचा त्यांना अनुभव आहे.

– 2026 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत तावडे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केरळमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आलेले खासदार आहेत. सध्या ते वित्तविषयक स्थायी समिती तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

Exit mobile version