Manipur Violence : गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज झालेल्या ताज्या हिंसाचाराच्या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज इंडियाची आघाडी मणिपूरला पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी दोन महिलांना विवस्त्र करत मारहाण केल्याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. थेट सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत केंद्र सरकारला सुनावले होते. त्यानंतर दोन महिलांना विवस्त्र करणाऱ्या लोकांविरोधात सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. मात्र तरीही रोज कोणाचे ना कोणाचे घर जाळत आहे. रोज एका आईचा गर्भ नष्ट होतोय.
सहा जखमी, तर सहा घरे जळाली
मणिपूरमधील हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार झाले आणि सुरक्षा कर्मचार्यांसह सहा जण जखमी झाले, तर बिष्णुपूरमध्ये हल्लेखोरांनी सहा घरे जाळली, अशी माहिती आयएनएस या वृत्तसंस्थेने दिली. पोलिसांनी शुक्रवारी (28 जुलै) रात्री ही माहिती दिली.
मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग; माजी लष्करप्रमुखांनी वर्तवली शक्यता
या भागात गोळीबार झाला
पोलिसांचे म्हणणे आहे की हल्लेखोरांनी फौगाकचाओ इखाई, हेकोले, तेराखोंसांगबी (बिष्णुपूर) आणि कांगवाई (चुराचंदपूर) भागात गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी (25 जुलै) सशस्त्र हल्लेखोरांनी इकोल आणि फुगाचाओ इखाई भागात केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या गावकऱ्याचा शुक्रवारी (25 जुलै) मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
300 हून अधिक बेकायदेशीर बंकर उद्ध्वस्त
उग्रवादी आणि हल्लेखोर ड्रोन, अत्याधुनिक शस्त्रे आणि मोटार वापरत आहेत. उग्रवादी गट आणि सुरक्षा दलांमध्ये सातत्याने गोळीबार होत आहे. केंद्र आणि राज्य दलांसह संयुक्त सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या महिन्यात आतापर्यंत विविध वांशिक गट आणि उग्रवाद्यांनी उभारलेले 300 हून अधिक बेकायदेशीर बंकर नष्ट करण्यात आले आहेत.