Viral Story : पहिल्या डेटवर लाखोंचा खर्च, दुसऱ्याच दिवशी तरुणीचा नकार कारण काय तर, टंXXल

Viral Dating Story तरुणाने पहिली भेट खास बनवण्यासाठी काळ्या रंगाची कार पाठवली होती. मात्र, दुसऱ्याचा दिवशी तरूणाचा मेसेज आपण दोघं...

Viral Dating Story

Viral Dating Story

Viral Dating Story : पहिली डेट म्हटलं की, दोघांच्याही मनात उत्सुकता असते. समोरची व्यक्ती कशी असेल, तिच्याशी आपलं जुळेल का आणि या भेटीतून नात्याची सुरुवात होईल का, असे अनेक प्रश्न असतात. अशाच एका डेटची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका तरूणाने त्याची पहिली डेट अविस्मरणीय करण्यासाठी आणि तरूणीला इंम्प्रेस करण्यासाठी महागडी कार, आलिशान रेस्टॉरंट आणि आवडीच्या पदार्थांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण डेटनंतर दुसऱ्याच दिवशी तरुणीने नातं पुढे नेण्यास नकार दिला. हा नकार देताना तरूणीने कारण काय सांगितलं तर, तरुणाचं टक्कल. त्यानंतर तरुणाने डेटवर केलेल्या खर्चाची परतफेड मागितल्याचा दावा समोर आलाय. या घटनेने सोशल मीडियावर नातेसंबंध, आवडीनिवडी आणि पैशांच्या व्यवहारावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं हे प्रकरण काय? 

झी न्यूज’च्या वृत्तानुसार, एक्सवर @raqisright या युजरने डेटिंगचा हा अनुभव शेअर केलाय. संबंधित तरुणाने पहिली भेट खास बनवण्यासाठी काळ्या रंगाची कार पाठवली होती. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर त्याने स्वतः पुढाकार घेतला. जेवणाची ऑर्डर देण्यापासून ते संपूर्ण संध्याकाळ तरुणीच्या आवडीनिवडी आणि आरामाची काळजी घेण्यापर्यंत त्याने प्रयत्न केले. तरुणीच्या म्हणण्यानुसार, या भेटीदरम्यान तिला सुरक्षित आणि सहज वाटत होतं. संपूर्ण संध्याकाळ चांगली गेली. त्यामुळे या भेटीनंतर दोघांमध्ये नातं पुढे जाण्याची शक्यता वाटत होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी या कहाणीला वेगळं वळण मिळालं.


डेटनंतर दुसऱ्या दिवशी तरुणीने तरुणाला मेसेज केला. ज्यात ती म्हणते की, कालची संध्याकाळ चांगली गेली, मात्र आपण दोघं दीर्घकाळ एकत्र राहू शकू असं वाटत नाही. कोणाचाही वेळ वाया घालवायचा नसल्याचं स्पष्ट करत तिने मैत्री कायम ठेवण्याचीही इच्छा व्यक्त केली. नात्याला नकार देताना तरूणीने तरुणाला टक्कल असल्याचे सांगितल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे करण्यात आला आहे.

नकार मिळताच तरुणाने मागितले पैसे?

या घटनेतील सर्वाधिक चर्चेचा भाग म्हणजे डेटवर झालेल्या खर्चाची परतफेड तरूणाने केल्याचे सांगितले जात आहे. नकार मिळताच तरुणाने तरुणीकडे जवळपास एक लाख रुपये परत मागितल्याची चर्चा आहे. मात्र, ही रक्कम नेमकी कशासाठी आणि कोणत्या आधारावर मागण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती किंवा स्पष्टता समोर आलेली नाही. मात्र, दोघांमध्ये आधीच खर्चाबाबत काही आर्थिक सहमती झाली असेल, तर परिस्थिती वेगळी असू शकते. या प्रकरणात अशी कोणतीही सहमती होती का, याची माहिती समोर आलेली नाही.

यूजर्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस

या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन मतप्रवाह दिसत आहेत. एका बाजूला काही जण तरुणीच्या निर्णयावर टीका करत आहेत. त्यांच्या मते, एखाद्याने एवढे प्रयत्न केल्यानंतर त्याच्या दिसण्यावरून नकार देणं वरवरच्या विचारसरणीचं लक्षण आहे. दुसरीकडे, अनेक जण तरुणीच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत. त्यांच्या मते, कोणासोबत नातं ठेवायचं, हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. पहिली डेट चांगली झाली म्हणजे प्रेमसंबंध निर्माण होतीलच, असं नाही.

आजच्या काळात डेटिंगमध्ये महागडी रेस्टॉरंट्स, महागड्या भेटवस्तू आणि खास अनुभवांवर खर्च करण्याचं प्रमाण चर्चेत असतं. काही जणांसाठी हा प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग असतो, तर काही जणांसाठी समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्याचा प्रयत्न असतो. पण महागडी डेट म्हणजे यशस्वी नातं, असं समीकरण नसतं. नातं टिकण्यासाठी एकमेकांबद्दल आकर्षण असण्यासोबतच विचारांची जुळवाजुळव, संवाद, विश्वास आणि परस्परांचा आदर महत्त्वाचा असतो. त्यामुळे एक लाखांची डेट असो किंवा साध्या चहाच्या कपावर झालेली भेट, नातं पुढे न्यायचं की नाही, याचा निर्णय पैशांवर नव्हे तर दोघांच्या इच्छेवर अवलंबून असतो.

टीप : ही बातमी सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारावर आहे. डेटचा खर्च, एक लाख रुपयांची मागणी आणि नकारामागील कारण यांची स्वतंत्र पुष्टी उपलब्ध नसल्याने हे तपशील दावे म्हणूनच मांडले आहेत.

Exit mobile version