Water scarcity due to Super El Nino: भारतासमोर पुन्हा एकदा एल-निनोचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील 180 हून अधिक पर्यावरण आणि हवामान शास्त्रज्ञांनी 2026-27 मध्ये अत्यंत शक्तिशाली एल-निनो निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम केवळ तापमान आणि पावसावरच नाही, तर भारतातील जंगले, नद्या, समुद्र, पर्वतीय परिसंस्था आणि वन्यजीवांवरही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील संशोधन 16 सप्टेंबर 2026 रोजी झेनोडो प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. वैज्ञानिकांच्या मते, प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानात होत असलेल्या बदलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
आगामी एल-निनो सामान्य एल-निनो वर्षांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार, संशोधन संस्था आणि निधी देणाऱ्या संस्थांनी आतापासूनच तयारी सुरू करावी, असं आवाहन वैज्ञानिकांनी केलं आहे. संकट निर्माण झाल्यानंतर त्याचे परिणाम अभ्यासण्याऐवजी जंगले, जलस्रोत, समुद्र आणि जैवविविधतेतील बदलांची आतापासूनच नोंद आणि देखरेख करण्यावर भर देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2026 पासून पुढील वर्षापर्यंत भारताच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा अधिक उष्ण आणि कोरडं हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सप्टेंबरअखेरीस पुन्हा पावसाचा जोर वाढणार; विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा
पाऊस कमी झाल्यास पाण्याची टंचाई वाढू शकते आणि त्याचा थेट परिणाम शेती, पशुपालन आणि जंगलांवर होऊ शकतो. विशेषतः आधीपासून पाण्याची कमतरता असलेल्या भागांसाठी परिस्थिती अधिक कठीण ठरू शकते. वाळवंटी आणि उंच पर्वतीय भागातील वनस्पती तसेच वन्यजीवांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जलस्रोतांवरील ताण वाढल्यास कृषी उत्पादनासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसू शकतो.
शहरांमध्येही उष्णतेचं संकट अधिक तीव्र होऊ शकतं. काँक्रीटची बांधकामं आणि रस्त्यांमुळे शहरी भाग आधीच तुलनेने अधिक तापतात. अशात दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा नागरिकांच्या आरोग्यासह शहरांमधील झाडं आणि वनस्पतींसाठीही आव्हान ठरू शकतात. दुसरी मोठी चिंता म्हणजे जंगलातील आगी. वाढतं तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे जंगलं अधिक कोरडी झाल्यास वणव्यांचा धोका वाढू शकतो. त्यातून वनस्पती, पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या अधिवासाचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
हवामानातील बदलांचा परिणाम प्राण्यांच्या अन्न उपलब्धतेपासून त्यांच्या प्रजनन चक्रापर्यंत होऊ शकतो. त्यामुळे जंगलातील विविध प्रजातींमधील नैसर्गिक समतोल आणि अन्नसाखळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एल-निनोचा परिणाम जमिनीपुरताच मर्यादित राहणार नाही. भारताच्या आसपासच्या समुद्री क्षेत्रात तापमान वाढल्यास सागरी उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात. समुद्राचं तापमान दीर्घकाळ वाढल्यास प्रवाळ भित्तिकांचं मोठ्या प्रमाणावर ब्लिचिंग होण्याचा आणि त्यामुळे सागरी परिसंस्थेवर परिणाम होण्याचा धोका आहे.
चॅट जीपीटीवर शोध, लोहगडाची रेकी अन् फेक इंस्टग्राम आयडी, केतन प्रकरणातील कथित कटाची संपूर्ण कहाणी
या सर्व बदलांचा अंतिम परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावरही होऊ शकतो. विशेषतः हवामानावर थेट अवलंबून असणारे शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांसमोर मोठी आव्हानं निर्माण होऊ शकतात. कमी पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, तर डोंगराळ भागात गवताची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे 2026-27 मधील संभाव्य शक्तिशाली एल-निनोकडे केवळ हवामानातील एक बदल म्हणून न पाहता त्याचे पर्यावरण, शेती, जलस्रोत, जैवविविधता आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन आतापासूनच तयारी करण्याची गरज वैज्ञानिकांनी अधोरेखित केली आहे.
