सुपर एल निनोचे संकट’; पण गुजरातमधील शहरं पाण्याखाली का गेली ?

Umbergaon: गेल्या दोन दिवसांत गुजरातच्या काही भागात प्रचंड पाऊस कोसळला आहे. त्यात नद्यांना पूर आला आहे. अनेक शहरांमध्ये पाणी घुसले आहेत

  • Written By: Published:
Umbergaon Rain Imd

Umbergaon record 1064mm rainfall: सुपर एल निनोमुळे (2026 Super El Nino) देशावर दुष्काळाचे संकट असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. या अंदाजानुसार देशातील काही भागात अत्यल्प पाऊस होत आहे. तर काही भागात अक्षरश: ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत गुजरातच्या काही भागात प्रचंड पाऊस कोसळला आहे. त्यात नद्यांना पूर आला आहे. अनेक शहरांमध्ये पाणी घुसले आहेत. तर वाहने वाहून गेले असून, चाळीस हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर वसलेल्या किनारपट्टी लगतच्या उंबरगाव शहरावर आभाळ कोसळले आहे. वलसाड जिल्ह्यातील या शहरात एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. हा एक विक्रम आहे. चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पडणारे हे देशातील तिसरे शहर ठरले आहे.


देशातील सर्वाधिक पाऊस पडलेले गुजरातमधील उंबरगाव तिसरे ठिकाण

उंबरगाव येथे 23 जुलैपर्यंत 24 तासांत 1,064 मिमी (106.4 सेंमी) पावसाची विक्रमी नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार भारताच्या इतिहासातील 24 तासांतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस म्हणून या घटनेची नोंद झालीय. मेघालयातील चेरापुंजी येथे 16 जून 1995 ला 1563 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा देशातील सर्वाधिक पाऊस आहे. लक्षद्वीपमधील अमिनीदेवी 1168 मिलीमीटर पावसाची नोंद 6 मे 2004. तर आता गुजरातमधील उंबरगाव येथे चोवीस तासांत 1064 मिलीमीटर पावसांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस पडणारे हे तिसरे ठिकाण आहे.

कोणत्या शहरात किती पाऊस ?
100 सेंटीमीटरहून अधिक पाऊस केवळ 24 तासांत झाल्याने वलसाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक भागांत बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. वलसाड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. उंबरगाव (उमरगाव)- 1,064 मिमी, कपराडा – 794 मिमी, धारमपूर – 562 मिमी, वापी – 550.4 मिमी, पारडी – 514 मिमी
नानीपालसन – 460 मिमी, वलसाड हवामान केंद्र – 392 मिमी पावसाची नोंद झाली आहे. IMD च्या माहितीनुसार, वलसाड जिल्ह्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली. 22 जुलै रोजी कपराडा येथे 417 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर 23 जुलै रोजी उमरगावसह जिल्ह्यातील अनेक भागांत विक्रमी पाऊस झाला.


एवढा विक्रमी पाऊस का झाला?

भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण गुजरातमधील या अतिवृष्टीमागे तीन हवामान प्रणालींचा एकत्रित परिणाम कारणीभूत ठरला आहे. मध्य प्रदेशावरील वरच्या स्तरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती पश्चिमेकडे सरकत राजस्थानकडे गेली.त्यामुळे मान्सूनचा द्रोणीय पट्टा (Monsoon Trough) नेहमीपेक्षा दक्षिणेकडे राहिल्याने मोठ्या प्रमाणात आर्द्रतेचे संकेद्रण झाले. जम्मू-काश्मीर परिसरातील पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) आणि मान्सून प्रणाली यांचा परस्पर परिणाम झाला आहे. त्यामुळे येथे विक्रमी पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

एकीकडे एल निनोचा फटका बसेल अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे वेगळी हवामान परिस्थिती निर्माण होऊन एकाच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी खूप पाऊस होणे हे धोक्याचे घंटा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांचे आहे.

follow us