Chandipura Virus आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
Chandipura Virus : महाराष्ट्रातील शेजारील राज्य गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 22
Chandipura Virus : महाराष्ट्रातील शेजारील राज्य गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू झाला असून सात मुलांवर उपचार सुरु आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, संशयास्पद वाटणाऱ्या 184 रुग्णांपैकी 35 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चांदीपुरा व्हायरसची लागण झालेली सात मुले गांधीनगर, साबरकांठा-हिम्मतनगर, पाटण, राजकोट आणि भावनगर येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
सर्व रुग्ण 15 वर्षांखालील
गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदीपुरा व्हायरसची लागण झालेले सर्व रुग्ण 15 वर्षांखालील आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने वाळूमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या भागात विशेष तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मातीच्या घरांच्या भिंतींना असलेल्या भेगा बुजवण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे, कारण या भेगांमध्ये हे कीटक आपली पैदास करतात.
चांदीपुरा व्हायरसशी मिळती-जुळती लक्षणे असलेल्या कोणत्याही मुलाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना सर्व सरकारी आणि खाजगी बालरोग रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. मुलाची प्रकृती अधिक बिघडण्यापूर्वी उपचार सुरू करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार केल्यास अवयव निकामी होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?
चांदीपुरा व्हायरस हा वाळूमाशीच्या (Sandfly) चावण्यामुळे पसरणारा एक धोकादायक संसर्गजन्य विषाणू आहे. यामुळे मुलांच्या मेंदूला सूज (एन्सेफलायटिस) येते. हा एक ‘झुनोटिक’ (Zoonotic) विषाणू आहे, म्हणजेच तो प्राणी किंवा कीटकांकडून मानवांमध्ये पसरतो. वाळूमाशी किंवा तत्सम लहान कीटकांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आल्यास मुलांना या विषाणूची लागण होऊ शकते.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे
ताप
अशक्तपणा
थकवा
डोकेदुखी
शरीर दुखणे
स्नायू दुखणे
उलट्या होणे
संसर्ग बळावल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया, फिट्स येणे, बेशुद्ध पडणे आणि अवयव निकामी होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
चांदीपुरा व्हायरसवर उपचार
सध्या चांदीपुरा व्हायरसवर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. यासाठी कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. उपचारांमध्ये आधारभूत काळजी (सपोर्टिव्ह केअर), रुग्णालयात सखोल देखरेख आणि मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो.
‘आपले, संदिग्ध, विरोधी’ मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा
सुरक्षित कसे राहावे?
चंडीपुरा विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांना बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुण्याची सूचना द्या.
प्राणी आणि कीटक यांच्याशी संपर्क टाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करा.
उघड्या हातांनी कीटक मारणे टाळा. त्याऐवजी हातमोजे (ग्लोव्हज) वापरा.
माशा आणि डासांपासून स्वतःचा बचाव करणे महत्त्वाचे आहे.